मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर सडकून टीका केली. औरंगाबादमधील विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज विमानतळ नाव देण्यावरून उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपाला घेरलं. राज्याच्या विधानसभेत एकमुखाने विमानतळाच्या नावाबाबत ठराव देऊनही केंद्राने मान्यता का दिली नाही? असा सवाल त्यांनी केला. तसेच जनतेचे प्रश्न तसेच ठेऊन केवळ शहराचं नाव बदललं तर स्वतः छत्रपती संभाजी महाराज मला रायगडावर चल म्हणत टकमक टोक दाखवतील, असंही मत व्यक्त केलं. ते बुधवारी (८ जून) औरंगाबादमधील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर आयोजित सभेत बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उद्धव ठाकरे म्हणाले, “भाजपाला सत्ता असताना सुचत नाही आणि सत्ता गेल्यावर एकदम यांच्या अंगात येतं. संभाजीनगर कधी करणार, संभाजीनगर कधी करणार? हे कोणी सांगायचं आपल्याला, त्यांनी? संभाजीनगरचं वचन माझ्या वडिलांनी शिवसेना प्रमुख हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिलंय. ते मी विसरलेलो नाही, मी विसरणार नाही, ते केल्याशिवाय राहणार नाही.”

“विमानतळाचं नाव छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असं का होत नाही?”

“संभाजीनगर कधी करणार असं जे ओरडताय, बोंबलताय त्यांना मला सांगायचं आहे की जवळपास एक-दीड वर्ष झालंय. कॅबिनेटने मान्यता दिलीय. एक सुरुवात म्हणून माझ्या या संभाजीनगर विमानतळाचं नाव छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करा असा ठराव आम्ही केंद्र सरकारला दिलाय. का होत नाही अजून? तुमच्याकडे काही दिलं की झाकून ठेवायचं आणि आम्ही काही केलं नाही तर बोंबलत सुटायचं हा आक्रोश होऊ शकत नाही,” असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

“…तर छत्रपती संभाजी महाराज मला रायगडावरचं टकमक टोक दाखवतील”

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “मी जेव्हा या शहराचं नामांतर करेन तेव्हा छत्रपती संभाजी महाराज यांना आदर्श वाटेल, अभिमान वाटेल असं हे नगर करून दाखवेन, हे वचन मी तुम्हाला देतो. नाही, तर नाव बदलायला काय मी आत्ता बदलू शकतो, पण नाव बदललं आणि तुम्हाला पाणी दिलं नाही, नाव बदललं आणि खड्ड्याचे रस्ते दिले, नाव बदललं आणि रोजीरोटी नसेल तर संभाजी महाराज सुद्धा म्हणतील की रायगडावर चल, तुला टकमक टोक दाखवतो.”

हेही वाचा : हिंदूत्व भगव्या टोपीत असेल, तर संघ काळी टोपी का घालतो? : उद्धव ठाकरे

“…त्यानंतर आम्ही भाजपाचा सत्कार करू”

“नावाला सार्थ असं माझं शहर असलं पाहिजे. म्हणून आधी भाजपाने दिल्ली दरबारी विमानतळाच्या नावाचा जो प्रस्ताव दिलाय तिकडे जाऊन आक्रोश करावा. आमच्या राज्याच्या विधानसभेत एकमुखाने चिखलठाणा विमानतळाचं नाव छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करायचं असा ठराव झालाय. तो ठराव आधी भाजपाने केंद्राकडून मंजूर करून आणावा. त्यानंतर आम्ही तुमचा सत्कार करू,” असंही उद्धव ठाकरे यांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray comment on chhatrapati sambhaji maharaj and development in aurangabad pbs
First published on: 08-06-2022 at 22:48 IST