गेल्या तीन महिन्यांपासून राज्यात शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा थेट सामना पाहायला मिळत आहे. मात्र, त्याच्याही अनेक वर्ष आधीपासून नारायण राणे, नितेश राणे आणि निलेश राणे यांनी शिवसेनेवर जाहीररीत्या असंख्यवेळा टीका केली आहे. त्यामुळे राणे आणि ठाकरे गट यांच्यातील सख्य जगजाहीर असतानाच आता ठाकरे गटातील एका आमदाराने केलेल्या सूचक विधानामुळे चर्चेला उधाण आलं आहे. विशेष म्हणजे पत्रकार परिषदा किंवा एरवीही कार्यक्रमांमध्ये उद्धव ठाकरे आणि इतर नेतेमंडळींवर जाहीरपणे आक्रमक टीका करणारे राणे कुटुंबीय ठाकरे गटाच्या सोबत कसे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

गेल्या दोन दिवसांपासून नितेश राणे, नारायण राणे आणि भास्कर जाधव यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांचा जोरदार कलगीतुरा सुरू आहे. अनेकदा खालच्या पातळीवर करण्यात आलेल्या टीकेमुळे हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांच्या नेत्यांवर गंभीर आरोप आणि टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून अशा प्रकारचं विधान आल्यामुळे तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.

काय घडलं दोन दिवसात?

आधी नितेश राणेंनी भास्कर जाधव घरातून बाहेर पडू शकणार नाहीत, अशा आशयाचं विधान केल्याचा दावा भास्कर जाधवांनी कुडाळमध्ये बोलताना केला. त्याच दिवशी रात्री त्यांच्या चिपळूणमधील घरावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचा दावा करण्यात आला. दगड, स्टम्प आणि काचेच्या बाटल्या बंगल्याच्या आवारात आढळल्या. त्यानंतर नितेश राणेंनीही ‘नेत्यांवर टीका कराल तर कार्यकर्त्यांना संताप येणार नाही का?’ असं म्हणत अप्रत्यक्षरीत्या या प्रकाराचं समर्थनच केलं. बेडूक, चरसी कार्ट, कोंबडीचोर या भास्कर जाधवांच्या टीकेला नितेश राणेंनी भटका कुत्रा म्हणत प्रत्युत्तर दिलं. त्यामुळे राजकीय वर्तुळातही या भाषेवर आक्षेप घेण्यात येत आहेत.

‘मी, फडणवीस, पवार एकत्र असल्यानं काही जणांची…”; शरद पवारांसमोर भाषण करताना मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंना टोला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“राणे कुटुंबीयांना समजायला हवं की..”

दरम्यान, कोकणातील स्थानिक शिवसेना नेत्यांवर राणेंकडून सातत्याने टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींनी राणे कुटुंबीय ठाकरे गटासोबतच असल्याचं विधान केलं आहे. “नितेश राणे आमचा विरोधक आहेच. राणे कुटुंबीयांना समजायला हवं की आज नारायण राणे, नितेश राणे किंवा निलेश राणे या कुटुंबाला बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद लाभला म्हणून ते मोठे झाले. त्यामुळे त्यांनी माझ्यावर आरोप करणं फार चुकीचं आहे. मी शिवसेना प्रमुखांशी, शिवसेना पक्षाशी किती प्रामाणिक आहे हे त्यांना सांगण्याची गरज नाही. मी तर म्हणेन, ये अंदर की बात है, राणे कुटुंब हमारे साथ है”, असं साळवी म्हणाले आहेत.