हिवाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे. आज अधिवेशनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचीही उपस्थिती होती. विधान भवनात एक अनोखा योगायोग पाहण्यास मिळाला. महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून उद्धव ठाकरेंवर चंद्रशेखर बावनकुळे टीका करत आहेत. बावनकुळे आणि उद्धव ठाकरे एकमेकांसमोर आले. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी एकच कोपरखळी मारली आणि उपस्थितांमध्ये हशा पिकला.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

नागपूरच्या विधानभवनाच्या मुख्य प्रवेशद्वारावर जेव्हा उद्धव ठाकरे आणि चंद्रशेखर बावनकुळे एकमेकांच्या समोर आले तेव्हा “काय एकटेच जाता?” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी चंद्रशेखर बावनकुळेंना कोपरखळी मारली. ज्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. काही दिवसांपूर्वी बावनकुळे यांचा मकाऊमधला कथित फोटो पोस्ट करत संजय राऊत यांनी त्यांच्यावर यथेच्छ टीका केली होती. तसंच उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातही बावनकुळे यांचा समाचार घेतला होता. तर चंद्रशेखर बावनकुळे हे उद्धव ठाकरेंवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. अशा सगळ्या गोष्टी असताना हे दोन नेते समोरसमोर आले तेव्हा एका वाक्यामुळे सगळ्यांमध्येच हशा पिकला.

उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

नागपूरमध्ये राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अशातच शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार आदित्य ठाकरे यांची दिशा सालियान मृत्यू प्रकरणात विशेष तपास पथकामार्फत ( एसआयटी ) चौकशी होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. यावरून शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारला थेट इशारा दिला आहे. आम्ही सांगू तेव्हा तुमच्याही कुटुंबाच्या एसआयटी चौकशा लावू, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. ते विधिमंडळाच्या बाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

प्रफुल्ल पटेलांवरून उद्धव ठाकरेंनी भाजपाला घेरलं आहे. “नवाब मलिकांना दूर ठेवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना पत्र लिहिलं होतं. तोच न्याय प्रफुल्ल पटेलांबाबत लावणार आहात की नाही?” असा सवाल उद्धव ठाकरेंनी भाजपाला विचारला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सत्ताधारी पक्षाकडून गुंडगिरी

उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी पक्ष गुंडगिरी करत असल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, पत्रांचा जमाना आहे निवडणूक आयोगाला पत्र दिलं आहे. उपमुख्यमंत्र्यांनी दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांना पत्र दिलं आहे. या पत्राचं आम्ही स्वागत करतो. जो न्याय नवाब मलिकांना तोच प्रफुल्ल पटेल यांना लागणार का? असा सवाल त्यांनी भाजपला केला. मोदी यांनी स्वतः बीकेसीमधील सभेत कुछ लोक मिरची का व्यवहार करते है, आता त्यांच्यावर कारवाई करणार का? असाही टोला त्यांनी भाजपला यावेळी लगावला.