कर्ज माफी करु म्हटले होते. ती केली नाही. दिवाळीपर्यंत मदत देऊ असे सांगितले होते, तीही मिळाली नाही. ‘शक्तपीठ ’ चे अधिकारी निजामापेक्षा अधिक अत्याचार करत आहेत, अशी कैफियत ९० वर्षाच्या हिंगोली येथील शेतकरी गोविंद लांडे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडली. कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा गावात शेतकरी संवाद मेळाव्यात या शेतकऱ्याने दिलेली ही प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांच्या ‘ दगा बाज रे’ बैठकांना पाठबळ देणारी ठरली.
लातूरमधील भुसणी येथील शेतकरी संवाद दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे हे नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर येथे पोहचले. हिंगोली येथील कळमनुरी येथे शेतकरी मेळाव्यात अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या अडचणी उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडल्या. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला त्यांनी प्रतिउत्तर दिले. शेतकऱ्यांसाठी न्याय मागितला म्हणजे टोमणे मारणे आहे का, असा सवाल ठाकरे यांनी केला. राज्य सरकारने घोषित केलेले पॅकेज हा एक घोटाळा आहे, असेही ते म्हणाले.
शेतकऱ्यांनी आता विमा कंपन्यावर मोर्चा काढावा असे आवाहनही त्यांनी केले. पॅकेज म्हणजे ‘ संभ्रम घोटाळा’ आहे, असेही ते म्हणाले. आम्हाला शक्तपीठचा रस्ता नको पण सरकार ऐकत नाही. आता व्यथा ऐकून घेतल्या नाही तर राज्य सरकारला लोळवू, असा निर्धार या वेळी व्यक्त करण्यात आला. कंत्राटदाराच्या विकासाासाठी ही योजना करण्यात आली असून त्याला विरोध केला जाईल. पण त्यासाठी मलाही शेतकऱ्यांचे पाठबळ हवे असल्याचे ठाकरे म्हणाले. शेतकऱ्यांना हमीभाव दिला तर तो कर्जमुक्ती मागणार नाही. पण तोही मिळत नाही. त्यामुळे मतचोरी करुन सत्तेवर आलेल्या लोकांना घेराव घाला आणि नुकसान भरपाई मागा, असे आवाहनही ठाकरे यांनी केले.
राज्य सरकारला वठवणीवर आणण्यासाठी जातपात न बघता एकत्र आले पाहिजे. येत्या १५ दिवसा विम्याची यादी बघू आणि विमा कंपन्यांवर मोर्चा काढू, असेही ठाकरे म्हणाले.मराठवाड्यात सहा जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांचे दौरे आता झाले आहे. हिंगोलीमध्ये शेतकऱ्यांनी कैफियत मांडत अतिवृष्टीबरोबरच शक्तिपीठामध्येही लक्ष घालावे, अशी विनंती या वेळी उद्धव ठाकरे यांना केली. या वेळी शिवसेना नेते अंबदास दानवे, नागेश पाटील आष्टीकर चंद्रकांत खैरे यांची उपस्थिती होती.
