इंदापूर: उजनी धरणाच्या जलाशयामध्ये मंगळवारी बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत बुडालेल्या सहा जणांचे मृतदेह शोधण्यात आज सकाळी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाला यश आले. मात्र त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. आज दुर्घटनेच्या तिसऱ्या दिवशी सकाळपासून बुडालेल्या व्यक्तींचा शोध घेण्याची मोहीम सुरू करण्यात आली होती.

ज्या ठिकाणी बोट बुडाली होती त्या परिसरात आज सकाळी एका पाठोपाठ एक असे पाच मृतदेह आढळून आले. त्यानंतर सहावा मृतदेह सापडला. सहा जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असून आज सकाळी तिसऱ्या दिवशीही उजनी जलाशयाच्या दोन्ही काठावर बुडालेल्या व्यक्तींचे नातेवाईक व ग्रामस्थ बसून होते. आज राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवानांना या व्यक्ती आढळून आल्या मात्र त्या मृतावस्थेत. उजनीकाठ नातेवाईकांच्या आक्रोशाने पुन्हा गहिवरला.

हेही वाचा : मोठी बातमी! प्रवरा नदीत शोधकार्य सुरू असताना SDRF ची बोट उलटून तिघांचा मृत्यू

काल दुपारी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकाला जलाशयात बोटीचा ठाव ठिकाणा लागला होता. मात्र पाण्यात बुडालेल्या कोणाचाही शोध लागला नव्हता. बोटीत असलेली एक मोटरसायकल सापडली होती. आज सकाळपासूनच राष्ट्रीय आपत्ती दलाचे वीस जवान तीन बोटीद्वारे शोध घेत होते. काही मच्छीमारांच्या होडीही त्यांच्या मदतीला होत्या. काही स्थानिक बोटीही या मोहिमेत सहभागी झाल्या. छत्तीस तासांच्या अथक परिश्रमानंतर आज बोट दुर्घटनेत सापडलेल्यांचा शोध लागला. मात्र ते मृतावस्थेत आढळून आले. दरम्यान त्यांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी करमाळा ग्रामीण रुग्णालयात पाठवले असून त्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत.

हेही वाचा : सोलापूर : उजनी जलाशयात बोट बुडून दुर्घटना; ६ बेपत्ता व्यक्तींच्या शोधकार्यासाठी एनडीआरएफ पथक आले धावून

या दुर्घटनेतील गोकुळ दत्तात्रय जाधव (वय ३०), कोमल गोकुळ जाधव ( वय २५), माही गोकुळ जाधव (वय ३), शुभम गोकुळ जाधव (वय अठरा महिने, सर्व रा. झरे ता. करमाळा) अनुराग ज्ञानदेव अवघडे (वय २६), गौरव धनंजय डोंगरे (वय २४ रा. कुगाव ता. करमाळा) यांचा शोध लागला असून सहाही जण मृत्युमुखी पडले आहेत.