राज्यात मागील काही दिवसांमध्ये पावसाने थैमान घातलं. यामध्ये अनेक ठिकाणी घडलेल्या दुर्घटनांमध्ये कित्येकांना जीव गमावावा लागला. अनेकांचे संसार उध्वस्त झाले, अनेकजणांचे नातलग अद्यापही बेपत्ता आहेत. तर, आजही अनेक गावं व शहरांना पुराने वेढा दिलेला असल्याने, तेथील नागरिक मदतीच्या प्रतीक्षेत आहे. रायगड जिल्ह्यात महाडमधील तळीये गावाती घरांवर दरड कोसळून घडलेल्या भयानक दुर्घटनेत आतापर्यंत ४४ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे, तरी अद्यापही तिथे मदतकार्य सुरूच आहे. या गावास आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीयमंत्री नारायण राणे व विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी भेट देऊन, तेथील परिस्थितीची पाहणी केली. यानंतर नारायण राणे यांनी माध्यमांशी बोलताना भावाना व्यक्त केल्या.

“केवळ एकच गोष्ट आम्हाला परत आणता येणार नाही, ते म्हणजे मृत्यू झालेल्यांना परत आणता येणार नाही. ही दुर्दैवी बाब आहे पण जे आहेत त्यांना अतिशय चांगल्या प्रकारे दिलासा देऊ शकू असा मला विश्वास वाटतो.” असं नारायण राणेंनी बोलून दाखवलं आहे.

माध्यमांशी बोलताना नारायण राणे म्हणाले की, “आज आम्ही या दुर्दैवी घटनेची पाहणी करायला आलोय आणि माझ्या माहितीप्रमाणे प्रवीण दरेकर हे या ठिकाणी दुसऱ्यांदा आलेले आहेत. ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. नैसर्गिक आपत्ती अकस्मात घडल्यामुळे फार मोठ्या प्रमाणात, अनेकांचा मृत्यू झालेला आहे. ४४ मृतदेह आढळून आले आहेत आणि उर्वरीत मृतदेह काढण्याचे काम सुरू आहे. जवळपास ८७ जणांचा मृत्यू झाल्याचं समजत आहे. अधिकाऱ्याचं काम अतिशय प्रामाणिकपणे सुरू आहे.”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज चिपळूणमध्ये; नारायण राणे, देवेंद्र फडणवीसही पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर

तसेच, “या घटना घडल्यानंतर जे काही लोकं या ठिकाणी मृत्यू पावले आहेत, त्यांच्या कुटुंबीयांना मदत केंद्र व राज्य सरकारकडून देण्यात आली असली, तरी देखील त्या मदतीच्या पलीकडे आणखी मदत होणार नाही असं काही नाही. या लोकांचं पुर्णपणे पुनर्वसन पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत यांना चागंली पक्की घरं देण्याची योजना राबवली जाईल. राज्य सरकार व केंद्र सरकार दोघेही मिळून परत ही वसाहत चांगल्याप्रकारे बांधतील.इथली शासकीय यंत्रणा जिल्हाधिकारी व त्यांचे सहकारी पोलीस विभाग अतिशय़ चांगलं काम करत आहेत. त्यामुळे या नैसर्गिक आपत्तीमधून जे लोक वाचलेली आहेत, त्यांना आधार किंवा चांगल्याप्रकारे सांभाळण्याचं काम आम्ही करण्याचा प्रयत्न करू..” असं देखील नारायण राणेंनी यावेळी सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याचबरोबर “मी आताच जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की यांच्यासाठी एक प्रांत स्तराचा अधिकारी त्यांना द्या. त्यांनी केलेल्या मागणीती पुर्तता करावी. नुकतच मी गावचे सरपंच व इतर काहींशी बोललो, त्यांची इच्छा आहे की याच गावात आमचं तत्काळ व कायमचं पुनर्वसन व्हायला पाहिजे. ते सांगतील त्या प्रमाणे जिल्हाधिकारी त्यांना आता जी तात्पुरती वसाहकत किंवा त्यांचं पुनर्वसन करण्याचा प्रयत्न ते करतील तशा सूचना मिळाल्या आहेत आणि कायमस्वरूपी देखील स्थानिक गावातील लोकं सुचवतील त्या ठिकाणी त्यांचं पुनर्वसन व सर्व नागरी सुविधा त्यांना दिल्या जातील.” असं आश्वासनही यावेळी राणेंनी दिलं.