राजापूर : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पडणार्‍या अवकाळी पावसाने बुधवारी रात्री पुन्हा एकदा लांजा व राजापुर तालुक्यामध्ये हजेरी लावली. विजांचा कटकडाट आणि ढगांचा गडगडाट करीत सुमारे अर्धातासाहून अधिक मुसळधार पाऊस सुरु झाला. यापावसामध्ये एका झाडावर वीज पडून मुंबईतून गावी आलेल्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

राजापुर व लांजा तालुक्यात रात्री पाऊस पडल्यानंतर गुरुवारी दिवसभर ढगाळ वातावरण राहीले होते. गेल्या आठवडाभरापासून तालुक्यामध्ये सातत्याने अवकाळी पाऊस पडत आहे. रात्री पावसाने चांगलाच जोर धरला. ढगांचा गडगडाट, वीजांचा कडकडाट आणि जोडीला सोसाट्याच्या वार्‍याचीही साथ होती. अशातच सुमारे अर्धातासाहून अधिक काळ पाऊस पडला. लांजा तालुक्यात कोसळल्या पावसाने एकाचा बळी घेतला.

लांजा तालुक्यात जोरदार पाऊस सुरू असताना झाडाच्या आडोशाला थांबलेल्या दोघांवर अचानक वीज कोसळली. यामध्ये राजेश चिमाजी जाधव (वय ४५)रा. गोविळ बौद्धवाडी यांचा जागीच मृत्यू झाला, तर समीर चंद्रकांत पवार (वय ३५) यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. राजेश जाधव आणि समीर पवार हे दोघे बुधवारी सकाळी मुंबईहून मोटारसायकलने गोविळ या गावी येत होते. सायंकाळी गोविळमध्ये पोहोचल्यानंतर ते आपल्या घराकडे जात असताना अचानक विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू झाला. त्यामुळे दोघांनीही रस्त्यालगतच्या एका झाडाखाली आश्रय घेतला. मात्र त्याचवेळी वीज दोघांवर कोसळली. या भीषण दुर्घटनेत राजेश जाधव यांचा जागीच मृत्यू झाला, तर समीर पवार यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. या घटनेनंतर जखमी समीर पवार याने गावात जावून लोकांना याची माहिती दिली. त्यानंतर दोघांनाही लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.