युनियन बँकेचे थकीत कर्ज; परळी परिसरात असंतोष

बीड : भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी उभारलेला आणि अधिक गाळप करण्यात एकेकाळी आशिया खंडात डंका वाजवलेला वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना जमिनीसह १३१.९८ कोटी रुपयांत खासगी उद्योजक ओंकार साखर कारखान्यास विक्री करण्यात आला. कारखान्याचेच तत्कालीन कायदेविषयक सल्लागार ॲड. परमेश्वर गित्ते यांनीच अंबाजोगाई येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्त नोंदणीच्या आधारे कारखाना विक्री केल्याचा आरोप केला आहे.

या व्यवहारात दिवंगत मुंडे यांचे स्मारक असलेल्या गोपीनाथ गडाचीही जागा येत असल्यामुळे परळी परिसरातील शेतकरी, कारखान्याचे सभासद, नागरिकांमधून तीव्र असंतोष व्यक्त होत आहे. गेल्या काही वर्षांत युनियन बँक ऑफ इंडियाकडून वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने कर्ज काढले होते. त्या कर्जाची परतफेड न झाल्याने युनियन बँकेने जप्तीपोटी हा कारखाना विक्री केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याची माहिती आहे.

दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या तथा राज्याच्या पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून मात्र या प्रकरणात अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही. त्यामुळे वैद्यनाथ विक्रीच्या गोंधळाचा धूरच परळी व परिसरात निघणे सुरू झाले आहे. गोपीनाथ मुंडे यांचे २०१४ साली निधन झाले. त्यानंतरपासून कारखान्याचा कारभार पंकजा मुंडे यांच्याकडे आहे. यावेळी कारखान्यावर असलेले कर्ज आणि पुढील काळातील कारखान्यात झालेल्या काही दुर्घटना यामुळे वैद्यनाथ कारखाना काही वर्ष बंद होता. कारखान्यावरील थकीतचे कर्ज आणि वस्तू आणि सेवा कर याबाबतच्या अनेक नोटिसाही कारखान्याला बजावल्या गेल्या.

युनियन बँकेने सरफेसी ॲक्ट खाली जप्तीची नोटीस दिली होती. पुढे १७ डिसेंबर २०२२ साली कारखाना युनियन बँकेने आहे त्या स्थितीमध्ये जप्त केला. कुठलाही सहकारी साखर कारखाना विकताना साखर आयुक्तांची परवानगी लागते, परंतु या विक्री व्यवहारामध्ये कुठेच परवानगी दिसून आली नसल्याचा आरोपही ॲड. परमेश्वर गीते यांनी केला आहे.

कारखान्याची अंदाजे किंमत एक हजार कोटीपेक्षा अधिक

सध्याच्या कारखान्याची एकूण अंदाजे किंमत ही एक हजार कोटीपेक्षा अधिक आहे. ओंकार साखर कारखाना प्रायव्हेट लिमिटेड यांनी वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना खरेदीचा प्रस्ताव ठेवला होता. यामध्ये ओंकार कारखाना एकटाच बोलीधारक असेल असा प्रस्ताव वैद्यनाथ कारखान्यापुढे होता. पुढे २८ ऑगस्ट २०२४ रोजी युनियन बँकेने विक्री संमती मागितली. ३० ऑगस्ट २०२४ रोजी कारखान्याने विक्री संमती दिली, असा आरोप आहे.

वैद्यनाथ कारखाना पंकजा मुंडे यांनी सभासद व शेतकऱ्यांना कुठलीही सर्वसाधारण सभा न घेता विश्वासात न घेता परस्पर विक्रीचा ठराव युनियन बँकेला दिला. बँकेकडून कारखाना ओंकार साखर कारखाना प्रा. लि. ला विक्री केला. यामुळे शेतकऱ्यांचा फार मोठे नुकसान होणार आहे. शासनाने या कारखान्याची विक्री थांबवून कारखाना पुनर्प्रस्थापित करावा. – ॲड. परमेश्वर गित्ते