शिंदे फडणवीस सरकारला मतदानातून जोडे मारण्यासाठी जनता वाट बघते आहे. ज्या पद्धतीने यांनी शिवसेनेशी आणि ठाकरे कुटुंबाशी बेईमानी केली आहे. जोडे मारायचे असतील तर त्यांनी स्वतःला जोडे मारुन घेतले पाहिजेत. या कार्यकर्त्यांना काम नाही, त्यांना आज काम मिळेल असं म्हणत संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका केली आहे. तसंच बेईमान्यांवर वीर सावरकरही थुंकले होते हा इतिहास आहे. मी तशी कृती केली तर चूक काय? असंही संजय राऊत यांनी विचारलं आहे. आज संजय राऊत त्र्यंबकेश्वर मंदिरात जात आहेत. नाशिकमध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
बेईमान शिवराज्याभिषेक सोहळा करतात यापेक्षा दुर्दैव काय?
बेईमान जाऊन शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करतात यापेक्षा मोठं दुर्दैव काय? उद्याच्या निवडणुकीत यांचं पानिपत होणार आहे. निवडणूक महापालिकेची असो किंवा विधानसभा, लोकसभा असो हे निवडणूक हरणार आहेत. आज त्यांना काम मिळतंय त्यांना चांगली प्रसिद्धी द्या. त्यांची बेईमानी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचली पाहिजे. जोडे मारण्याच्या कार्यक्रमाने खऱ्या शिवसेनेवर काहीही परिणाम होत नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.




वीर सावकरही बेईमान्यांवर थुंकले होते
मी कुणावरही थुंकलो नाही. वीर सावरकरांना एकदा कोर्टात आणलं गेलं. वीर सावरकरांनी पाहिलं की त्यांची माहिती देणारा बेईमान कोपऱ्यात उभा आहे. त्याच्याकडे बघून वीर सावरकर थुंकले होते. त्यामुळे बेईमान्यांवर थुंकणं ही हिंदू संस्कृती, हिंदुत्वाचा एक भाग आहे. मी कुणावरही थुंकलो नाही. पण वीर सावरकरांनीही बेईमान्यांवर थुंकणं ही संस्कृती असल्याचं दाखवून दिलं होतं. इतिहासात त्याची नोंद आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
मी वीर सावरकरांचा भक्त आहे
मी वीर सावरकरांचा भक्त आहे. लोकमान्य टिळक, बाळासाहेब ठाकरे यांच्या चांगल्या गोष्टी आम्ही घेत असतो. चीड आणि संताप कोणत्याही प्रकार व्यक्त होऊ शकतो. मी थुंकलो कुठे मला दाखवा. माझा दाताचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे त्यातून व्यक्त झालेली कृती आहे. त्यांना असं वाटतं आहे की लोक आमच्यावर थुंकत आहेत. त्यांची ही मानसिकता आहे. त्यांना झोपेतही वाटतं ही लोक आमच्यावर जोडे मारत आहेत. हे खरं आहे लोक त्यांच्यावर थुंकत आहेत. मी कशाला ते व्यक्त करु? असंही संजय राऊत म्हणाले आहेत.
अजित पवारांना प्रत्युत्तर
अजित पवारांनीही असं म्हटलं आहे की संजय राऊत किंवा कुणीही बोलताना संयम राखला पाहिजे. याबाबत संजय राऊत यांना विचारलं असता धरणामध्ये मुतण्याचं वक्तव्य करण्यापेक्षा थुंकणं चांगलं असं जोरदार प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिलं आहे. तसंच ज्याचं जळतं त्याला कळतं असंही संजय राऊत म्हणाले आहेत. आम्ही भोगतो आहोत. आम्ही सगळं भोगूनही जमिनीवर उभे आहोत. मी माझ्या पक्षाबरोबर ठामपणे उभे आहोत. आमच्या मनात पक्ष बदलण्याचा आणि संकटं येत आहेत म्हणून भाजपासारख्या पक्षाबरोबर सूत जुळवण्याचा आमचा विचार होत नाही.
१३० कोटी लोकांना माफी मागावी लागेल. कारण लोक कुठे ना कुठे थुंकत असतात. त्यामुळे कुणी काही म्हटलं तरी माफी मागण्याचा काय प्रश्न येतं? मी राजकीय नेत्यांची नावं घेतल्यावर थुंकलो नाही तर बेईमान्यांची नावं घेतल्यावर थुंकलो हा फरक लक्षात घ्या. ज्यांनी महाराष्ट्राशी, शिवसेनेशी, ठाकरे कुटुंबाशी आणि बाळासाहेब ठाकरेंशी बेईमानी केली त्यांचं नाव समोर आलं त्यानंतर माझी जीभ चावली गेली त्यातून ती कृती झाली. यांना जीवशास्त्र, रसायन शास्त्र, मानसशास्त्र बिघडलं आहे असंही संजय राऊत म्हणाले.