राज्यात नवरात्र उत्सवास आज(सोमवार) पासून सुरुवात झाली आहे. या उत्सव कालावधीत दररोज रात्री गरबा खेळण्याची देखील परंपरा आहे. दररोज रात्री राज्यभरात अनेक ठिकाणी गरबा खेळला जातो. गरबा खेळण्यासाठी तरूण-तरूणी, महिला-पुरुषांची मोठ्यासंख्येने उपस्थिती असते. विविध नवरात्र उत्सव मंडळांकडून मोठ्याप्रमाणावर गरबा कार्यक्रम आयोजित केले जातात. आता याच पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषदेने “गरबा खेळण्यास येणाऱ्यांचे आधार कार्ड तपासा आणि गैरहिंदूंना गरबाच्या ठिकाणी प्रवेश देऊ नका.” अशी मागणी केली आहे.

या संदर्भात विश्व हिंदू परिषदेचे विदर्भ प्रांत प्रमुख गोविंद शेंडे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले की “दरवर्षी संपूर्ण देशभरात मोठ्याप्रमाणावर गरबा कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. मुली, महिलांसह अनेक लोकांचा त्यामध्ये मोठा सहभागही असतो. गरबा म्हणजेच काय तर देवीला प्रसन्न करण्यासाठी आपण नृत्य करत असतो. याचा अर्थ असा होतो की त्या देवीवर माझी श्रद्धा आहे. तिला प्रसन्न करण्यासाठी, तिच्या प्रती समर्पण करण्यासाठी आणि तिचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हा गरबारूपी नृत्य करून आम्ही तिला प्रसन्न करत असतो. मात्र हे कोण करू शकतं? तर ज्याची श्रद्धा देवीवर आहे तोच हे करू शकतो. परंतु ज्याची श्रद्धाच या देवीवर नाही, देवीला जो मानत नाही, मूर्तीपूजा जो करत नाही. त्याने या गरबामध्ये यावच कशाला?”

नागपूर शहरात दोन वर्षानंतर नवरात्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ ; रंगणार गरबा दांडियाचा खेळ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याचबरोबर “अनेक ठिकाणी बघितलं गेलं आहे की, गैरहिंदू अशी अनेक मुलं त्या ठिकाणी येतात आणि मग त्याचे दुष्परिणाम आम्हाला समाजात बघावे लागतात. लव्ह जिहादच्या घटना घडतात. प्रेमप्रसंग, छेडछेडीचे प्रकार यामुळे पालकांसाठी अडचणीची स्थिती निर्माण होते. समाजात तेढ निर्माण होते. या सगळ्या गोष्टींना रोखण्यासाठी गैरहिंदूंना तिथे प्रवेशच न द्यावा, अशी आमची मागणी आहे. अनेकजण नावं बदलून या ठिकाणी येतात आणि मुलींना फसवतात. पोलीस, स्थानिक प्रशासन आणि आयोजकांनी याकडे लक्ष द्यावे. आधार कार्ड तपासूनच गरबाच्या ठिकाणी प्रवेश दिला जावा. अशी मागणी आम्ही सर्व ठिकाणच्या पोलीस आयुक्तांकडे करणार आहोत.” अशी देखील माहिती यावेळी शेंडे यांनी दिली.