अलिबाग : मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावर सुकेळी खिंड परिसर जलमय झाला होता. जवळपास अर्धा किलोमीटर परिसरात दिड ते दोन फूट पाणी साचल्याने, वाहतूक विस्कळीत झाली होती.
जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचा मुंबई गोवा महामार्गालाही फटका बसला. महामार्गावर नागोठणे जवळील सुकेळी खिंडीत पावासाची पाणी साचले होते. त्यामुळे रस्त्याला नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. पाण्याचा निचरा होण्याची यंत्रणा कुचकामी ठरल्याने, पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे काही काळ या परिसरातील वाहतूक रोखून धरण्यात आली होती. काही वाहनचालक जोखीम पत्करून पाण्यातून वाहने घालत होते.
ही परिस्थिती सुकेळी खिंडीपूरती मार्यादीत नाही, पेण, हमरापूर, तारा येथील उड्डाण पूलांवर पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होत नसल्याने पाणी साचत आहे. ज्यामुळे वेगात आलेल्या वाहनांचा अपघात होण्याची शक्यता आहे. कर्नाळा खिंड आणि आपटा फाटा परिसरातही काही ठिकाणी महामार्गावर पाणी साचत असल्याच्या तक्रारी आहेत.
या परिस्थितीमुळे मुंबई गोवा महामार्गाच्या कामाबाबत प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत. कोकणात मोठा प्रमाणात पाऊस पडतो, त्यामुळे महामार्गावर पाण्याचा निचरा करण्यासाठी उपाययोजना असणे गरजेचे आहे. मात्र या महामार्गाचे काम करतांना पाण्याचा निचरा करणारी व्यवस्था का केली गेले नाही असा प्रश्न या निमित्ताने वाहन चालकांकडून उपस्थित केले जात होते. दरम्यान अतिवृष्टीमुळे पोलादपूर जवळ महामार्गा मंगळवारी कशेडी घाटात दरड कोसळली. ज्यामुळे काही काळ विस्कळीत झाली होती.