Vijay Wadettiwar On Satara Woman Doctor Suicide Case : सातारा जिल्ह्यामधील फलटण शहरातील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका महिला डॉक्टरने एका हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली. या मृत महिला डॉक्टरने आत्महत्येपूर्वी स्वत:च्या तळहातावर सुसाइड नोट लिहिली होती. त्यामध्ये दोन जणांवर मानसिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे.
या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला असल्याची माहिती सांगितली जात आहे. दरम्यान, या घटनेनंतर आता सर्वच क्षेत्रातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. या घटनेवर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे. रक्षकच भक्षक बनत असल्याचं म्हणत कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
विजय वडेट्टीवार काय म्हणाले?
“जेव्हा रक्षकच बनतो भक्षक! फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने फाशी घेत आत्महत्या केली. आत्महत्या करताना त्यांनी हातावर सुसाईड नोट लिहिली आहे. त्यात उल्लेख आहे की, एका पोलीस अधिकाऱ्याने बलात्कार केला आणि सतत मानसिक त्रास दिला. पोलिसांचे काम हे रक्षण करण्याचे आहे पण तेच जर महिला डॉक्टरचे शोषण करत असतील तर न्याय मिळणार कसा? या मुलीने याआधी तक्रार करूनही कारवाई का झाली नाही? महायुती सरकार वारंवार पोलिसांना पाठीशी घालत आहे, त्यातूनच पोलीस अत्याचार वाढत आहे”, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
“या प्रकरणी नुसते चौकशीचे आदेश देऊन उपयोग नाही. या पोलीस अधिकाऱ्याला नोकरीतून बडतर्फ केले पाहिजे, नाही तर तपासावर ते दबाव टाकू शकतात. आधी तक्रार करूनही त्याची दखल का घेण्यात आली नाही. आधी, कोणी दुर्लक्ष केले, या पोलिसांना पाठीशी घालणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे. पोलिसांवर कारवाई होत नाही तोपर्यंत पोलिसी अत्याचाराला आळा बसणार नाही”, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

सुप्रिया सुळेंनीही व्यक्त केला संताप
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मागणी केली आहे की या प्रकरणाची चौकशी करून दोषींना कठोर शासन करावं. त्यांनी यासंदर्भात एक्सवर एक पोस्ट केली आहे. सुप्रिया सुळे यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे की “सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत महिला डॉक्टरचे आत्महत्या प्रकरण अतिशय गंभीर आहे. या महिलेने लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये तिने गेल्या काही दिवसांपासून तिचा शारिरिक आणि मानसिक छळ होत असल्याचं वरीष्ठांना वारंवार कळवलं होतं. परंतु, तिच्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही. अखेर तिने टोकाचं पाऊल उचललं.”
फलटण, जि. सातारा येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत महिला डॉक्टरचे आत्महत्या प्रकरण अतिशय गंभीर आहे. या महिलेने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये तिने गेली काही दिवसांपासून तिचा शारिरीक आणि मानसिक छळ होत असल्याचे वरीष्ठांना वारंवार कळविले होते. परंतु तिच्या तक्रारीची दखल घेतली गेली…
— Supriya Sule (@supriya_sule) October 24, 2025
“या विषयाच्या मूळाशी नेमकं कोणतं कारण आहे? या महिलेच्या तक्रारीची दखल का घेतली गेली नाही? या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली पाहिजेत. संबंधित महिलेला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांना शिक्षा होणं आवश्यक आहे. माझी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आग्रही मागणी आहे की या प्रकरणाची चौकशी करुन दोषी व्यक्तींना कठोर शासन करावं. आरोग्य यंत्रणेत काम करणाऱ्या तसेच राज्यातील प्रत्येक महिलेला सुरक्षित वातावरण मिळालंच पाहिजे ही आमची भूमिका आहे.”
