सोलापूर : स्थानिक गुन्हे शाखा आणि बार्शी पोलिसांनी आगळगाव-बार्शी रस्त्यावर भोयरे गावात ७०० किलो गांजासह दोन मालमोटारी आणि एक मोटार कार जप्त केली आहे. त्याची तब्बल एक कोटी ५० लाख रुपयांची किंमत दर्शविण्यात आली आहे. यात उपसरपंचाला अटक करण्यात आली आहे.
दुपारी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, बार्शी उपविभागाचे पोलीस अधिकारी अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे व त्यांच्या पथकाने सापळा लावला. यावेळी एक मालमोटार आणि एक आयशर टेम्पो आणि मोटार अडविण्यात आली. छापा टाकल्यानंतर मालमोटारी व आयशरमध्ये भरलेल्या गोण्यांमध्ये गांजाचा साठा आढळला.
मालमोटारीत १९६ किलो, तर आयशरमध्ये ४९४ किलो असा मिळून एकूण ६७२ किलो गांजा आढळून आला. या कारवाईदरम्यान आयशरचालक तथा गावाच्या उपसरपंचाला अटक करण्यात आली. मालमोटार आणि स्विफ्ट कार या दोघांचे चालक पसार झाले असून, त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. ही कारवाई एनडीपीएस कायद्याखाली नोंद करण्यात आली आहे.
फांद्या तोडताना पडल्याने मृत्यू
सोलापूर महानगरपालिका उद्यान विभागातील माळी कायम कामगार प्रभू धुळप्पा कलशेट्टी (५२) हे तुळजापूर वेशीतील हुतात्मा स्तंभ येथे उद्यान देखभालसाठी कार्यरत होते. झाडाच्या फांद्या अस्ताव्यस्त वाढल्याने ते कापायला झाडावर चढले. फांद्या कापत असताना तोल जाऊन जमिनीवर कोसळले. यात डोक्यात मार लागून रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात झाला, त्यावेळी त्यांची प्रकृती चिंताजनक होती, यातच त्यांची प्राणज्योत मालवली.
प्रभुराज कलशेट्टी हे मूकबधिर होते. ते भवानी पेठेत राहत होते. यापूर्वी त्यांनी महात्मा गांधी प्राणी संग्रहालय, रूपा भवानी उद्यान येथेही सेवा बजावली होती. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने कलशेट्टी कुटुंबच उघड्यावर आले आहे. ते कर्तव्य बजावत असताना मरण पावल्याने त्यांना तातडीची मदत व अनुकंपा तत्वावर त्यांच्या मुलांना महापालिका सेवेत घेण्याची मागणी केली जात होती. दरम्यान, आमदार विजयकुमार देशमुख यांनी कलशेट्टी कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. पुढील कार्यवाहीसाठी प्रकरण पाठवण्याची हमी घेतली.