केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना कणकवली पोलिसांनी भाजपा आमदार नितेश राणे यांच्या विरोधातील प्रकरणात नोटीस बजावली आहे. राणेंनी मंगळवारी (२८ डिसेंबर) पत्रकार परिषदेत नितेश कुठे आहे हे सांगायला मी मूर्ख आहे का असं म्हटल्यानंतर पोलिसांनी ही नोटीस बजावली आहे. त्यांना ३ वाजेपर्यंत हजर राहण्यास सांगण्यात आले. मात्र, ३ वाजून गेल्यानंतरही राणे हजर झालेले नाही. त्यामुळे सिंधुदुर्गमधील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काही शिवसैनिकांनी नारायण राणेंना नितेश राणेंचा पत्ता माहिती आहे असं म्हणत पोलिसांकडे त्यांच्या चौकशीची मागणी केली. यावर आता शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विनायक राऊत म्हणाले, “कणकवलीचे शिवसेना उप जिल्हाप्रमुख सचिन सावंत आणि युवासेनेचे उप जिल्हा संघटक राजू राठोड यांनी कणकवली पोलीस स्टेशनला लेखी तक्रार केली आहे. यात नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत नितेश राणे कुठे आहे हे सांगायला मी मूर्ख आहे का असे उद्गार काढले. यातून नितेश राणे कुठे आहेत हे नारायण राणे यांना १०० टक्के माहिती आहे. केंद्रातील मंत्री गुन्हेगाराला पाठिशी घालत आहेत, लपवून ठेवत आहेत. म्हणून पोलिसांनी राणेंची चौकशी करावी आणि नितेश राणे कुठे आहेत याची माहिती घ्यावी. तसेच आरोपीला पकडावं अशी मागणी करण्यात आली आहे.”

कणकवली पोलिसांनी नारायण राणे यांना दिलेली नोटीस

“या प्रकरणात पोलिसांचे हात कणकवली ते दिल्लीपर्यंत गेलेत”

“संतोष परब यांना जीवे मारण्याचा प्रयत्न ज्या माध्यमातून झाला त्याची सखोल चौकशी पोलिसांनी करावी. यात वावगं काहीच नाही. चौकशी करताना कणकवलीपासून पुण्यापर्यंत पोलिसांचे हात गेले. लोहगाव विमानतळापासून दिल्लीपर्यंत पोलिसांचे हात गेले आहेत. त्यामुळे भारताचा कायदा किती सक्षम आहे हे यावरून सिद्ध होतं. त्यामुळेच पोलिसांनी दिल्ली, पुण्यावरून आरोपी पकडून आणले असं दिसतंय. पोलीस आणखी यामागे कुणी आहे का हे शोधत आहेत. त्यात ही मोठी धेंडं सापडत आहेत. कारण त्यांचा पूर्वइतिहास देखील तसाच आहे,” अशी माहिती विनायक राऊत यांनी दिली.

“यांनी निवडणुकीच्या काळात रक्तरंजित इतिहास घडवला”

विनायक राऊत म्हणाले, “यापूर्वी देखील यांनी निवडणुकीच्या काळात रक्तरंजित इतिहास घडवण्याचं काम केलंय. या निवडणुकीत देखील तसंच करण्याचा प्रयत्न होता. कायद्याचे हात त्यांच्यापर्यंत पोहचले. हे त्यांचं दुर्दैव आहे, पण भारताचा कायदा आजही सक्षम आहे हे सुदैव आहे. जे आरोपी पकडण्यात आले ते आणि ज्यांचा शोध सुरू आहे त्यांचे अतिशय घनिष्ठ संबंध आहेत. दररोजच्या उठण्याबसण्यातील आहेत.”

“आमचा आधीपासून नितेश राणेंवरच संशय होता”

“या मंडळींनी आजपर्यंत अनेक अवैध कामं केली आहेत. आमचा आधीपासून नितेश राणेंवरच संशय होता. पोलिसांनाही तपासात तेच आढळलं. नाकेबंदीत पोलिसांना गाडी मिळाली आणि गाडीतील आरोपीही मिळाले,” असंही त्यांनी नमूद केले.

हेही वाचा : “नारायण राणे यांना कोण दीपक केसरकर असा प्रश्न पडला असेल तर त्यांनी ‘ती’ घटना आठवावी”

दरम्यान, आज (२९ डिसेंबर) कणकवली न्यायालयात नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी होत आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vinayak raut comment on police notice to narayan rane in nitesh rane arrest pbs
First published on: 29-12-2021 at 16:00 IST