वसंतराव नाईक जयंतीदिनी मतदार दिन नाही

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन साजरा करण्यात येत असतानाच त्याच दिवशी राज्य मतदार दिन साजरा करण्याच्या आदेशावरून वाद निर्माण झाल्याच्या पाश्र्वभूमीवर राज्य सरकारने मतदार दिनाची तारीख बदलून वाद आणखी वाढणार नाही याची खबरदारी घेतली आहे.

वसंतराव नाईक यांच्या जयंती १ जुलै हा कृषी दिन म्हणून वर्षांनुवर्षे साजरा केला जातो. राज्य शासनाने २० मे रोजी काढलेल्या आदेशानुसार १ जुलै हा दिवस राज्य मतदार दिन  म्हणून साजरा करण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले होते. कृषी दिनानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. प्रत्येक जिल्ह्य़ांमध्ये कृषी दिनाला शेतकऱ्यांचा सत्कार किंवा अन्य कार्यक्रम साजरे केले जातात. त्याच दिवशी राज्य मतदार दिन साजरा करण्याचा आदेश निघाल्याने सरकारच्या पातळीवर गोंधळ निर्माण झाला होता.

वस्तू आणि सेवा कराला मान्यता देण्याकरिता गेल्या महिन्यात झालेल्या विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. वसंतराव नाईक यांची जयंती १ जुलैला राज्यभर कृषी दिन म्हणून साजरी करण्यात येत असताना त्याच दिवशी मतदान दिन म्हणून कसा साजरा करणार, असा सवाल अजितदादांनी केला होता. त्यावर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या निर्णयाचे समर्थन केले होते. १ मे हा महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन असे दोन्ही दिवस एकाच दिवशी साजरे केले जातात याकडे लक्ष वेधले होते.

वसंतराव नाईक यांच्या जयंतीच्या दिवशीच मतदार दिन साजरा करण्याच्या सरकारचा निर्णय राजकीयदृष्टय़ा भाजपला त्रासदायक ठरू शकला असता. राज्याचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्रिपद भूषविलेल्या वसंतराव नाईक यांचे महत्त्व कमी करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, अशी टीका सुरू झाली होती. नाईक यांच्या बंजारा समाजाची मते विदर्भ आणि मराठवाडय़ातील काही मतदारसंघांमध्ये निर्णायक ठरू शकतात. वसंतराव नाईक यांचा अपमान करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोप सुरू झाला होता. या पाश्र्वभूमीवर सरकारने एक पाऊल मागे घेतले. वित्तमंत्री मुनगंटीवार यांनी विधानसभेत एकाच दिवशी दोन दिवस साजरे करण्याच्या निर्णयाचे समर्थन केले होते, पण आता त्यात बदल करण्यात आला आहे.

एखाद्या समाजाची नाराजी नको म्हणून सरकारने आता आधीच्या निर्णयात बदल केला आहे. राज्य मतदार दिन आता १ जुलैऐवजी ५ जुलैला साजरा करण्यात येणार आहे. तसा आदेशच सरकारने जारी केला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जातो. मतदार जागृतीकरिता राज्य पातळीवर मतदार दिन साजरा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यातूनच १ जुलैचा प्रस्ताव पुढे आला होता. आता ५ जुलैला राज्यभर महाराष्ट्र सरकारच्या वतीने मतदान दिन साजरा केला जाईल. हा दिवस कशा प्रकारे साजरा करायचा याबाबत राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी निर्णय घेतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

वसंतराव नाईक यांचे महत्त्व कायम ठेवीत राज्य मतदार दिनाकरिता दुसऱ्या दिवसाची निवड करून सरकारने वाद टाळला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एखाद्या समाजाची नाराजी नको म्हणून सरकारने आता आधीच्या निर्णयात बदल केला आहे. राज्य मतदार दिन आता १ जुलैऐवजी ५ जुलैला साजरा करण्यात येणार आहे. तसा आदेशच सरकारने जारी केला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जातो. मतदार जागृतीकरिता राज्य पातळीवर मतदार दिन साजरा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.त्यातूनच १ जुलैचा प्रस्ताव पुढे आला होता. आता ५ जुलैला राज्यभर महाराष्ट्र सरकारच्या वतीने मतदान दिन साजरा केला जाईल. हा दिवस कशा प्रकारे साजरा करायचा याबाबत राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी निर्णय घेतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.