सातारा : वाई अर्बन बँकेला २०२४-२५ या आर्थिक वर्षांत ४ कोटी ५६ लाख रुपये निव्वळ नफा झाला आहे. नक्त एनपीएचे प्रमाण कमी राखण्यात बँकेला यश आले आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष श्री. अनिल मोरेश्वर देव यांनी दिली. बँकेच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेताना अध्यक्ष श्री. देव बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष डॉ. शेखर कांबळे व संचालक मंडळ विवेक पटवर्धन, मकरंद मुळये, काशीनाथ शेलार, प्रितम भुतकर, अशोक लोखंडे, चंद्रकांत गुजर, ज्योती गांधी आदी उपस्थित होते.

अध्यक्ष देव म्हणाले की, जून २०२३ मध्ये नवीन संचालक मंडळाने बँकेचा कारभार हाती घेतला. तेव्हा एनपीएचे प्रमाण ३६.५३ टक्के (रु ३२० कोटी) वरून यावर्षी ८.६५ टक्के(१३३ कोटी) पर्यंत खाली आणले आहे. राज्य शासनाच्या सहकार विभागाचे तत्कालीन जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी, जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रीक, जिल्हा विशेष लेखापरीक्षक श्रीधर कोल्हापुरे, पालक अधिकारी जनार्दन शिंदे यांच्या मार्गदर्शन व सहकार्याने बँकेने दि. ३१ मार्च २५ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षांत मोठ्या थकीत कर्जदारांवर कठोर कायदेशीर कारवाया करून एनपीएमध्ये मोठी वसुली केली. मागील तीन वर्षात या वर्षी प्रथमच नक्त नफा रु. ४.५६ कोटी मिळविला आहे. बँकेचा ९२०कोटी रुपयांचा एकत्रित व्यवसाय असून, भक्कम तरलता राखली आहे. बँकेची गुंतवणूक रु.३५० कोटी सरकारी कर्जरोख्यांच्या खरेदी विक्रीतून एक कोटींहून अधिक नफा मिळविला आहे.

बँकेचे भांडवल पर्याप्तता प्रमाण (सीआरएआर) १५.७५ टक्के इतके आहे. या आर्थिक वर्षात बँकेने ९० कोटी रुपये नव्याने कर्जवाटप केले आहे. ती कर्ज खाती नियमित आहेत. सध्या बँकेच्या २७ शाखा कार्यरत असून, त्यांची नफाक्षमता वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, अशी माहिती देव यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संचालक विवेक पटवर्धन यांनी सांगितले की, बँकेची सर्व ऑडिट झाली आहे. कर्ज वसुलीसाठी कारवाया सुरू राहतील. पुढील काळात अडचणीच्या कर्जव्यवहाराची जबाबदारी निश्चित करून गुन्हे दाखल होणार आहेत. कोणत्याही परिस्थितीत चुकीची कामे करणाऱ्यांना सोडणार नाही. पुढील काही महिनाभरात थकबाकी १२० कोटींपर्यंत खाली आणण्याचा प्रयत्न आहे. बँकेच्या कर्जव्यवहारावरील काही निर्बंध रिझर्व्ह बँक शिथील करेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीपाद कुलकर्णी, सरव्यवस्थापक चंद्रशेखर काळे, उपसरव्यवस्थापक संतोष बागुल उपस्थित होते.