मराठा आरक्षणाचा निर्णय अंतिम टप्प्यात आला आहे, असं सांगत आरक्षण न मिळाल्यास शांततेत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं आज जालन्यातील सभेत मनोज जरांगेंनी स्पष्ट केलं. तसंच, यावेळी त्यांनी मुंबईत येणार असल्याचाही इशारा दिला. मिश्किल भाषेत आज त्यांनी मुंबई दर्शन करण्यास येणार असल्याचं सांगितलं. तसंच, मंत्रालय किती उंच आहे हेही या मुंबई दर्शनावेळी पाहणार असल्याची खोचक टीका जरांगे पाटलांनी केली.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, काहीजण म्हणतात की २४ तारखेनंतर काय? आपण त्याबाबत निर्णय घेऊ. तुम्हाला घाई का आहे? २४ तारखेनंतर काय करायचं याबाबत मराठा समाजाची बैठक घेऊ. सरकारने आपले गुन्हे मागे घेतले नाही, मराठ्यांना ओबीसीत आरक्षण दिलं नाही तर पुढे काय करायचं याकरता मराठा समाजाची १७ तारखेला बैठक घेणार आहोत. यामध्ये उपोषणकर्ते, साखळी उपोषणकर्ते आणि मराठा समाज यांची एकत्रित अंतरवालीला किंवा पाऊस असेल तर एखाद्या मंगल कार्यालयात १७ डिसेंबरला बैठक घेतली जाईल. हे अन्यायच करायला लागलेत तर काय करणार? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
हेही वाचा >> “२४ डिसेंबरपर्यंत मराठा समाजाला आरक्षण द्यावं, अन्यथा…”, जरांगे-पाटलांनी सरकारला दिला थेट इशारा
ते पुढे म्हणाले, सगळे लोक मुंबईत जातात. अख्खं जग मुंबईत येत असतं. मग मुंबई आमची आहे की नाही? मुंबईला यायला आम्हाला काही हरकत नाही. आम्ही मुंबईत येऊन आंदोलन करणार नाही. मुंबईचं विमानतळ कसं आहे ते आम्हाला पाहायचं आहे. मुंबईचा समुद्र, गेट ऑफ इंडिया बघायचा आहे. बिस्किटं कसली बनतात हे पाहायचं आहे. मुंबईत येऊन आरक्षण द्या असं म्हणणार नाही. पण, ताज हॉटेल म्हणजे काय, शेअर मार्केट म्हणजे काय? ते कसलं असतं हे आम्हाला पाहायचं आहे. तिथे खूप जपानच्या कंपन्या आहेत हे पाहायचं आहे. नोटा छापायची इमारत पाहायची आहे. मंत्री कोणत्या गादीवर बसतात हे पाहायचं आहे. मंत्रालय किती उंच आहे हे पाहुदेत. लोकं म्हणतात की वर पाहायला गेलं की टोपी पडते. आम्हालाही पाहायचं आहे. आम्ही आमची भाकरी घेऊन येऊ. आम्हाला नुसती मुंबई बघायची आहे. बाकी काही करायचं नाही. आम्हाला वाटतं स्वच्छ महाराष्ट्र आणि भारत राहावा. पण नैसर्गिक विधी आम्ही थांबवू शकणार नाही. त्याची सोय करावी लागेल, अशा मिश्किल शब्दांत आज जालन्याती सभा मनो जरांगे पाटलांनी गाजवली.
हेही वाचा >> मराठा समाजाच्या सामाजिक मागसलेपणाच्या सर्वेक्षणाचे निकष अंतिम, प्रस्ताव राज्य सरकारकडे
ते पुढे म्हणाले की, आमच्या जातीच्या लेकराच्या न्यायासाठी आम्ही कोणत्याही टोकाला जाऊ शकतो. तुम्ही आम्हाला न्याय देणार असाल तर आम्ही तुम्हाला साध द्यायला तयार आहोत. पण, तुम्ही जर आमच्या लेकराचे मुडदे पाडले तर आम्हीही मुंबईत यायला मागे पुढे बघणार नाही. मी पुढे चालायला लागलो तर माझ्या मागे पुढे दोन कोटी लोक येतील. दोन कोटी लोकांच्या शौचासाठी किती सोय करावी लागेल? आम्हाला मुंबईला यायचं नाही, पण आमच्याशी दगाफटका करू नका. आमच्याशी दगाफटका केला तर काय होईल? उग्र काही होणार नाही. उग्राला आमचं समर्थन नाही. शांततेचं आंदोलन कोणालाही पेलत नाही. म्हणून आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत आलं आहे. ३२ लाख मराठ्यांच्या घरात प्रमाणपत्र गेलं आहे. आता २४ डिसेंबरला सर्व मराठ्यांना ओबीसी जात प्रमाणपत्र मिळणार आहे, असाही विश्वास त्यांनी यावेळी उपस्थित केला.