केरळात नैऋत्य मोसमी वाऱ्यांचं आगमन झाल्यानंतर मान्सूनने कर्नाटक किनारपट्टीच्या बहुतांशी भागात मजल मारली आहे. त्यानंतर गोव्याच्या सीमेवर मान्सून रेंगाळला आहे. वेळेआधीच महाराष्ट्रात मान्सून दाखल होईल, हा हवामान खात्याचा अंदाज देखील चुकला आहे. आता १२ ते १३ जून दरम्यान महाराष्ट्रात मान्सून दाखल होईल, अशी नवीन माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान पुढील काही दिवस कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात सर्वत्र पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.

उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे वगळता महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईसह, ठाणे, पालघर, नंदुरबार, धुळे जळगाव, भंडारा आणि गडचिरोली हे जिल्हे वगळता महाराष्ट्रात सर्वच जिल्ह्यांना हवामान खात्यानं पिवळा इशारा (येलो अलर्ट) दिला आहे. संबंधित जिल्ह्यात आज सकाळपासूनच ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काही तासांत या जिल्ह्यांमध्ये पूर्व मोसमी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.

पुढील पाच दिवस कमी अधिक प्रमाणात हीच स्थिती कायम राहणार आहे. मान्सूनच्या आगमनासाठी दक्षिण कोकणात पूर्व मोसमी पावसाची आवश्यकता असते. यामुळे महाराष्ट्रात मान्सूनच्या आगमनासाठी पोषक हवामान तयार होतं. पुढील तीन ते चार दिवस दक्षिण कोकणात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामानाची ही स्थिती मान्सूनच्या आगमानासाठी फायदेशीर ठरणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हवामान खात्याने आज पुण्यासह सांगली, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, नांदेड, परभणी, हिंगोली, नाशिक, बुलढाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांना पिवळा इशारा जारी केला आहे. पुढील काही तासांत याठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.