वाई: माझ्यासमोर उमेदवार कोण आहे हेच मला माहित नाही आणि माझी स्पर्धा कोणत्याही उमेदवाराशी नाही. माझी तत्त्वांशी स्पर्धा आहे. मी साताऱ्यात कोणालाही आव्हान देणार नाही. मी साताऱ्याचा विकास करण्याचा आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान वाढविण्याचा प्रयत्न करेन असे साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी सांगितले.

उमेदवारी जाहीर होताच शशिकांत शिंदे आज साताऱ्याला आले. त्यांचे साताऱ्याच्या सीमेवर सारोळा पुलावर कार्यकर्त्यांनी तुताऱ्यांचा गजर करत उत्स्फूर्त स्वागत केले. सातारा शहरासह ठिकठिकाणी गावोगावी तुतारी आणि ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले. मोठ्या संख्येने कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा – धुळ्यात भाजप, काँग्रेसमध्ये चुरशीची लढत ? शोभा बच्छाव यांच्या उमेदवारीनंतर जिल्हाध्यक्षांचा राजीनामा

यावेळी पत्रकारांशी बोलताना शिंदे म्हणाले, मी शरद पवारांचा आदेश आल्यानंतर ताबडतोब निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे. परिणामांचा विचार मी कधीही केला नाही. सर्वसामान्यांना सोबत घेऊन ही निवडणूक मी लढणार आहे. लोकांना जो अपेक्षित बदल हवा आहे तो बदल देण्याचा मी प्रयत्न करीन. सातारा हा छत्रपती शिवाजी महाराज, यशवंतराव चव्हाण, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा पुरोगामी जिल्हा आहे. साताऱ्याने कायम पुरोगामी विचारांची पाठराखण केली आहे. महाविकास आघाडी आणि जनतेच्या पाठिंब्यावर मी निवडणूक लढविणार आहे. लोकांमध्ये सत्ताधारी लोकांबद्दल प्रचंड नाराजी आहे आणि ती या निवडणुकीत मतदानातून बाहेर पडेल. साताऱ्यात प्रवेश करताना माझे सर्व स्तरातील लोकांनी स्वागत केले आहे. यामध्ये शेतकरी तरुणांची संख्या ही मोठी आहे. हा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. महायुतीने दाखविलेला विश्वास सार्थ करण्याचा मी प्रयत्न करीन. शरद पवार, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसच्या विचारांनी लोक माझ्या मागे खंबीरपणे उभे राहतील आणि पुन्हा एकदा या जिल्ह्यात इतिहास घडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हा जिल्हा यशवंतराव चव्हाण आणि शरद पवारांचा आहे. हे येथील सातारकर दाखवून देतील. या निवडणुकीत मला कोणाचेही आव्हान नाही, मी कोणाला आव्हान देणार नाही. मी जनतेच्या आवाहनावर निवडणुकीला सामोरे जात आहे. निवडणुकीत आरोप प्रत्यारोप होत असतात परंतु निवडणुक तत्त्वांना मुद्द्यांना घेऊनच करायची असते. निवडणुकीत आरोप प्रत्यारोप तर होतच असतात.

हेही वाचा – बीबीए, बीसीएबाबत शिक्षण संस्थांची नवी शक्कल… होणार काय?

जरांगे पाटलांचे आंदोलन आणि आपण या आंदोलनात नवी मुंबईमध्ये आंदोलकांची केलेली सोय हे आपल्या पथ्यावर पडेल काय असे विचारले असता शिंदे म्हणाले, मी त्यावेळी समाजबांधवांप्रती असलेले कर्तव्य केलं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या बांधवांची सोय करणं हे माझं कर्तव्यच होतं. राज्यात फक्त मराठा समाजाचाच प्रश्न नाही तर धनगर समाजाचंही अपील फेटाळले आहे. ओबीसी समाजामध्येही असंतोष आहे. सर्व जाती जमातीमध्ये आणि समाजामध्ये वाद लावण्याचे काम या शासनाने केला आहे. साताऱ्यातील माथाडींचे नेते नरेंद्र पाटील हे आपणास मदत करतील काय असे विचारले असता शिंदे म्हणाले, मी कालच जाऊन अण्णासाहेब पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं आहे. त्यावेळी नरेंद्र पाटील यांनी माझा सत्कार केला आहे. मात्र प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने आपल्या पक्षाचे काम करत असतो. मी त्यांना मुदतीची साथ घालीन ते त्यांच्या पद्धतीने मला मदत करतील.