लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

अलिबाग : अलिबागचा बहुप्रतिक्षीत पांढरा कांदा बाजारात दाखल होण्यास सुरूवात झाली आहे. लांबलेल्या पावसामुळे यंदा पांढरा कांदा नेहमी पेक्षा उशीराने दाखल झाला आहे. हंगामाची सुरवात असल्याने पुढील काही दिवस कांद्याचे दर चढेच राहण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. कांद्याची माळ २५० ते ३०० रुपायांना विकला जाण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

रुचकर चव आणि औषधी गुणधर्म यामुळे अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला बाजारात मोठी मागणी असते. साधारणे जानेवारी महिन्याच्या उत्तरार्धात हा कांदा बाजारात दाखल होण्यास सुरुवात होते. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने हा कांदा भाव खाऊन जात असतो. यंदाही अडीचशेहून अधिक हेक्टर क्षेत्रावर या कांद्याची लागवड करण्यात आली असून कांदा बाजारात दाखल होण्यास सुरवात झाली आहे.

अलिबाग तालुक्यातील नेहूली, खंडाळे, कार्ले, तळवली या गावांमध्ये प्रामुख्याने या कांद्याची लागवड केली जाते. भात कापणीनंतर साधारणपणे ऑक्टोंबर महिन्याच्या उत्तरार्धात शेतकरी सेंद्रीय पध्दतीने या कांद्याची लागवड करतात. नव्वद दिवसात कांदा काढणीसाठी तयार होत असतो. सध्या कांद्याच्या काढणीचे काम वेगात सुरू झाले असून, वाळलेल्‍या कांद्याच्‍या वेण्‍या बनवण्‍याचे काम सुरू झाले आहे. यातून महिलांना मोठया प्रमाणात रोजगार उपलब्‍ध होत आहे. व्‍यापारी शेतकरयांच्‍या बांधावर येवून कांद्याची उचल करीत आहेत आणि नवीन कांद्याला चांगला भावदेखील मिळतो आहे.

या कांद्याला वाढती मागणी आणि चांगली किंमत मिळत असल्याने गेल्या काही वर्षात लगतच्या गावात पांढऱ्या कांद्याची लागवड केली जाऊ लागली. यंदा पाउस उशिरा पर्यंत पडल्याने पाणी मुबलक होते. पांढऱ्या कांद्याचा आकार मोठा असेल. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणे अपेक्षित आहे.

पांढऱ्या कांद्याचे औषधी गुणधर्म

अभ्यासकांच्या माहितीनुसार या कांद्यात औषधी गुणधर्म आहेत. कांद्यात मिथाईल सल्फाईड आणि अमीनो अॅसिड हे घटक असतात. ज्यामुळे कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते. पोटातील उष्णता कमी होण्यासाठी कांदा उपयुक्त ठरतो. याच औषधी गुणधर्म आणि चवीमुळे या कांद्याला भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे.

बीजोत्‍पादन कार्यक्रम

औषधी गुणधर्मामुळे अलिबागच्‍या पांढरया कांद्याला बाजारात मोठी मागणी आहे. परंतु सध्‍या केवळ 250 हेक्‍टर क्षेत्रावर याची लागवड होते. हे क्षेत्र वाढवण्‍यात बियाण्‍यांच्‍या कमतरतेचा अडसर येतो आहे. हे क्षेत्र वाढवण्‍यासाठी रायगड जिल्‍हा प्रशासनाचे प्रयत्‍न सुरू आहेत. स्‍वतः जिल्‍हाधिकारी किशन जावळे यांनी पुढाकार घेतला आहे. जिल्‍हा नियोजन समितीच्‍या माध्‍यमातून निधी उपलब्‍ध करून बीजोत्‍पादनाचा कार्यक्रम हाती घेण्‍यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भौगोलिक मानांकन मिळाल्याने पांढऱ्या कांद्याला मागणी वाढली आहे. मुंबई पुण्यासारख्या महानगरातून कांद्यासाठी मोठी मागणी केली जात आहे. यंदा हवामान चांगले होते. त्यामुळे पिकही जोमाने आले आहे. कांद्याच्या काढणीला सुरवात झाली असून येत्या काही दिवसात कांदा बाजारात मुबलक प्रमाणात दाखल होईल. -सतीश म्‍हात्रे, शेतकरी, कार्ले