मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द केला. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी शिवसेनेकडून सतत होत असणाऱ्या टीकेचा समाचार घेतला. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर सतत खालच्या थराला जाऊन केली जाणारी टीका सहन केली जाणार नाही,’ असा इशारा फडणवीस यांनी दिला. यावेळेस पत्रकारांनी फडणवीस यांना मोदींवर आधीही टीका होत असताना तुम्ही शिवसेनेशी युती का केली? असा सवाल फडणवीस यांना केला. त्यावेळी त्यांनी केवळ हिंदुत्व या एकमेव विषयावर आम्ही युती केल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
‘विधानसभेच्या निकालाच्या दिवशी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषद घेतली. पहिल्याच पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सत्ता स्थापनेसाठी सर्व पर्याय खुले असल्याचे वक्तव्य केले. त्यांनी केलेले हे वक्तव्य आमच्यासाठी धक्कादायक होते,’ असही फडणवीस म्हणाले. तसेच “सत्तेत असतानाही शिवसेनेकडून वारंवार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर बड्या नेत्यांवर टीका केली जात होती. हे आम्हाला मान्य नाही. अशी टीका सहन केली जाणार नाही,” असा इशाराही फडणवीस यांनी दिला. यावरुनच पत्रकारांनी त्यांना ‘मोदींवर मागील बऱ्याच काळापासून शिवसेनेकडून टीका होत असताना तुम्ही शिवसेनेबरोबर युती करण्याचा निर्णय का घेतला?’, असा सवाल केला. या प्रश्नाचे उत्तर देताना फडणवीस यांनी ”हिंदुत्व या एकमेव मुद्द्यावर आम्ही पुन्हा युती करण्याचा निर्णय घेतला. मात्र जेव्हा युतीची चर्चा झाली तेव्हा व्यक्तीगत टीका केली जाणार नाही यासंदर्भात आमची त्यांच्याशी चर्चा झाली होती. त्यावेळी त्यांनी अशाप्रकारची टीका केली जाणार नाही असं स्पष्ट केलं होतं,” असं सांगितलं.
त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आजूबाजूचे लोक सतत काही ना काही वक्तव्य करुन दोन्ही पक्षांमध्ये दरी निर्माण करण्याचे काम करत असल्याचा अप्रत्यक्ष टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना फडणवीस यांनी लगावला. ‘निकालांनंतर युतीच्या चर्चेसाठी मी स्वत: उद्धव ठाकरे यांना अनेकदा फोन केला मात्र त्यांनी फोन उचलला नाही. दिवसातून अनेकदा शिवसेनेची काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी चर्चा व्हायची. मात्र आमच्यासोबत चर्चा करण्यात शिवसेनेला रस नव्हता. काही मुद्दे असतील तर ते चर्चेने सुटले असते मात्र शिवसेनेने चर्चा करण्याची तयारी दाखवली नाही,’ असं फडणवीस यांनी सांगितलं.