Ajit Pawar NCP Stance On Mumbai Municipal Corporation Elections: येत्या काही महिन्यांत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या या निवडणुका लवकरात लवकर घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या निवडणुका महायुतीबरोबर लढणार की स्वतंत्र, याबाबतची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे.
याबाबत एबीपी माझाशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले की, “याबाबत अद्याप अधिकृत चर्चा झालेली नाही. पण मुंबईत महानगरपालिकेची निवडणूक महायुती म्हणून लढावी. महायुतीत आहोत म्हणून कार्यकर्त्यांना संधी द्यायची नाही, हे मला योग्य वाटत नाही आणि पक्षालाही तसे वाटत नाही. म्हणून आम्ही सांगितले आहे की, स्थानिक स्तरावर तुम्हाला युती करायची असेल, तर अवश्य करा, त्याबाबत दुमत नाही. पण आम्ही कोणालाही युती करा किंवा स्वतंत्र लढा असे कोणतेही आदेश देणार नाही.”
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नागपूर येथे सध्या चिंतन शिबिर चालू आहे. या शिबिराच्या पहिल्या दिवशी बोलताना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी पक्षाची दिशा, पक्षाच्या विस्तारासाठीची रणनीतीबाबत भूमिका मांडली. तसेच पक्षशिस्तीबाबत पदाधिकारी आणि थेट मंत्र्यानाही खडे बोल सुनावले. जर पक्षाचे आदेश पाळले नाहीत तर खुर्ची सोडावी लागेल, असाही इशारा अजित पवार यांनी यावेळी दिला.
यावेळी पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी देखील पालकमंत्र्यांबाबत नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, “पालकमंत्री केवळ पर्यटन म्हणून एक दोन तासासाठी येतात, हे पक्ष हिताचे नाही. जर त्यांना पक्षाच्या कामासाठी यायचे असेल तर यावे केवळ पर्यटन म्हणून कृपया करून येऊ नये.”
या शिबिरामध्ये आगामी निवडणुका आणि पक्षाची भविष्यातील दिशा, पक्षाच्या विस्तारासाठीची रणनीती, युवा आणि महिला केंद्रित धोरणे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी बूथ रचना यांसारख्या महत्त्वाच्या मुद्यांवर विचारमंथन केले जाणार आहे.
पक्षाची आजवरची आणि भविष्यातील वाटचाल, तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व त्यातील यश यावर चर्चा होणार आहे. या चिंतन शिबिरात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारीचा आढावा घेण्यात येणार आहे.