सातारा: जिल्ह्यात पक्ष संघटना मजबूत करण्याबरोबर कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम करणार आहे. जिल्ह्यात मोठी विकास कामे आणण्याच्या पक्ष संघटनेची ध्येयधोरणे राबवली जातील असा निर्धार भाजपाचे जिल्हाध्यक्ष व कराड दक्षिणचे आमदार डॉ अतुल भोसले यांनी व्यक्त केला.
सातारा येथे डॉ भोसले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मनोज घोरपडे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावस्कर, आनंदराव पाटील, डॉ दिलीप येळगावकर, सातारा लोकसभा समन्वयक सुनील काटकर, माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, शहराध्यक्ष अविनाश खर्शीकर, माजी शहराध्यक्ष विकास गोसावी, राहुल शिवनामे इत्यादी यावेळी उपस्थित होते.
डॉ. भोसले म्हणाले, की भाजपच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी नियुक्त झाल्याबद्दल साताऱ्यात झालेल्या स्वागताने मी भारावलो आहे. पक्ष जिल्ह्यात मजबूत आहे. पक्षाचे चार आमदार येथे निवडून आले असून त्यापैकी दोन मंत्री आहेत. पक्ष संघटना वाढवल्यामुळे लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळाले. केंद्रात व राज्यात आपले सरकार असल्यामुळे यापुढील काळात आम्ही मोठी विकास कामे जिल्ह्यात आणणार आहोत.
अध्यक्षपदाच्या माध्यमातून तळागाळातील कार्यकर्त्यांना ताकद देणे जुने पदाधिकारी कार्यकर्ते यांना विश्वासाने सोबत घेऊन वाटचाल करणार आहोत. राज्यात महायुतीची सत्ता असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार महायुतीचे नेते जो निर्णय घेतील तो मान्य आहे. भाजप कार्यकर्ता कामाने मोठा होतो. आता छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले व बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहतील.
जिल्हाध्यक्ष पदासाठी इतर नावे पुढे येत होती. मी जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छुक नव्हतो. इतर कार्यकर्त्यांची नावे सुचवली होती. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाने मला जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. खासदार उदयनराजे, बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे . आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुती म्हणून निवडणूक लढवण्याची जाहीर केले असल्याचेही त्यांनी सांगितले.
साताऱ्यात शिवतीर्थावरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासह विविध मान्यवरांच्या पुतळ्याला अभिवादन करत अतुल भोसले खासदार उदयनराजेंच्या निवासस्थानी दाखल झाले. खासदार उदयनराजे भोसले यांनी शाल व पुष्पगुच्छ व शिवप्रतिमा देऊन अतुल भोसले यांचे स्वागत करत शुभेच्छा दिल्या. यावेळी कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे, लोकसभा संयोजक सुनील काटकर हे उपस्थित होते
सातारा जिल्ह्यात कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष डॉ भोसले यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. सारोळा, शिरवळ, खंडाळा, जोशीविहीर, वाई, आनेवाडी टोल नाका, लिंब खिंड, सातारा शहरात भाजपच्या कार्यकर्त्यांकडून भोसले यांचे जंगी स्वागत करण्यात आले . सातारा शहरात आल्यानंतर डॉ अतुल भोसले यांनी पोवई नाक्यावरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासह राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, शाहू चौकातील घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर , वीर लहुजी वस्ताद साळवे गोलबाग येथील प्रतापसिंह महाराज थोरले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
आगामी पालिका निवडणुकीत साताऱ्यात कमळ की आघाडी यावर आत्ताच मी बोलू शकत नाही. सातारा येथे दोन्ही राजांचा निर्णय अंतिम असतो. त्यामुळे पालिका निवडणुकांचा निर्णय दोन्ही राजेच घेतील त्यांचा जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल. – डॉ अतुल भोसले ,भाजपा, जिल्हाध्यक्ष.