सोलापूर : आपल्या मालकीच्या हॉटेलवर उतरलेल्या एका महिला प्रवाशाचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या माजी महापौर मनोहर सपाटे (वय ७०) यांच्या विरोधात राज्य महिला आयोगाने स्वतःहून दखल घेऊन याबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला दिले आहेत. दरम्यान, सपाटे यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर त्यांना अंतरिम जामीन देण्यास सत्र न्यायालयाने नकार दिला आहे.

मनोहर सपाटे यांनी आपल्या मालकीच्या हॉटेलमध्ये उतरलेल्या एका ४५ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. तसेच या प्रकरणात संबंधित पीडित महिलेने छुप्या कॅमेऱ्यातून विनयभंगाच्या घटनेचे केलेले चित्रीकरण समाज माध्यमातून उजेडात आल्यामुळे सपाटे यांच्या अडचणीत भर पडली आहे. परिणामी, राष्ट्रवादी शरद पवार पक्षातून त्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. तर दुसरीकडे राज्य महिला आयोगानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेत पीडित महिलेला न्याय मिळण्याच्या दृष्टीने कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सपाटे यांनी या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी ॲड. शशी कुलकर्णी यांच्या मार्फत न्यायालयात अर्ज दाखल केला असता त्यावर जिल्हा व सत्र न्यायाधीश जयदीप मोहिते यांनी त्यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यास नकार दिला. जामीन अर्जावर सरकार पक्षाचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी येत्या ४ जुलै रोजीची तारीख निश्चित केली आहे.