शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी उर्फ मनोहर भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. भिडे यांच्या वक्तव्यानंतर राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. दरम्यान, काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी संभाजी भिडेंवर सडकून टीका केली. संभाजी भिडे हे अफजल खानाचे वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यांचे वंशज आहेत. त्यांचं खरं नाव मनोहर कुलकर्णी आहे, अशी टीका यशोमती ठाकूर यांनी केली.

यशोमती ठाकूर यांच्या टीकेवर भाजपाचे खासदार अनिल बोंडे यांनी आक्षेप घेतला. संभाजी भिडे यांचा अपमान सहन करणार नाही. भिडे गुरुजींना शिव्या देऊन यशोमती ठाकूर यांनी शेकडो युवकांच्या भावना भडकवल्या असून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल व्हायलाच हवा, अशी मागणी अनिल बोंडे यांनी केली.

हेही वाचा- “…महात्मा गांधींचा अपमान सहन करणार नाही”, फडणवीसांचा संभाजी भिडेंना इशारा

अनिल बोंडेंच्या मागणीवर यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपा आणि संभाजी भिडे यांचं साटंलोटं आहे. त्यांचा याराना आहे, हे आता सिद्ध झालं आहे, अशी प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांनी दिली. तसेच आमच्यावर किती गुन्हे दाखल करायचे आहेत, तितके गुन्हे दाखल करा, आम्ही घाबरणारे लोक नाहीत, असंही ठाकूर म्हणाल्या. त्या ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होत्या.

हेही वाचा- भिडे गुरूजींचा अपमान सहन करणार नाही- खासदार अनिल बोंडे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनिल बोंडेच्या वक्तव्यावर भाष्य करताना यशोमती ठाकूर यांनी म्हटलं, “भिडे गुरुजी या माणसाचं खरं नाव मनोहर कुलकर्णी आहे. त्यांचं भाजपाशी साटंलोटं आणि याराना आहे, हे आता सिद्ध झालं आहे. आमचं ठाम मत आहे की, आमच्यावर किती गुन्हे दाखल करायचे आहेत, तितके गुन्हे दाखल करा. आम्ही घाबरणारे लोक नाहीत. पण तुमचे चेहरे जगासमोर आणल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करा. तुम्ही आम्हाला तुरुंगात टाका किंवा मारुन टाका. तुम्ही आम्हाला मारू शकता, तुरुंगात टाकू शकता आणि आपल्या महात्म्यांबद्दल घाणेरडं बोलू शकता. पण आम्ही हे सहन करणार नाही. आमच्यावर जेवढे वार करायचे आहेत, तेवढे वार करा, आम्ही तुमचा चेहरा पर्दाफाश केल्याशिवाय शांत बसणार नाही.”