सावंतवाडी : मुंबई येथील प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात दि.२९ व ३० सप्टेंबर रोजी यलो अलर्ट (६५ ते ११५ मी.मी. पाऊस) दि. २८ सप्टेंबर रोजी ऑरेंज अलर्ट (११५ ते २०४ मी.मी.पाऊस) आणि दि. १ ऑक्टोबर रोजी ग्रीन अलर्ट (६५ मी.मी. पेक्षा कमी पाऊस) देण्यात आलेला आहे.
तसेच दि. ३० सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात गडगडाट होऊन विजा चमकण्याची तसेच सोसाटय़ाचा वारा वाहण्याची शक्यता आहे. या कालावधीत नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिच्छद्र सुकटे यांनी केले




झाड अंगावर कोसळल्याने आंजीवडे येथील दोघांचा मृत्यू
श्री गणेश चतुर्थीनिमित्त भजन करून परताना सावंतवाडी राजवाडा शेजारच्या रस्त्यावर भले मोठे भेडले माडाचे झाड थेट अंगावर कोसळल्याने कुडाळ तालुक्यातील अंजिवडे येथील दोघे तरुण जागीच ठार झाले. भेलडे माड कोसळताना वीज वाहिन्या खाली आल्याने त्यांना वीज वाहिन्यांचा स्पर्श झाल्याचा संशय आहे. ही घटना मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास राजवाडय़ाच्या बाजूला असलेल्या परिमल टॉवर समोर घडली.
या नैसर्गिक आपत्तीत राहुल प्रकाश पंदारे (वय २४) व समिर उर्फ संभाजी दत्ताराम पंदारे (वय २१) रा. गवळीवाडी आंजीवडे अशी या दोघांची नावे आहेत. सावंतवाडी शहरातील गोठण परिसरात राहत असणारे दशावतार कलाकार गौरव शिर्के यांच्या सोबत भजनासाठी ते आले होते. तेथून परतत असताना हा अपघात घडला. याबाबत अधिक माहिती अशी की, यातील दोघेही मृत युवक सावंतवाडी गोठण येथे भजनासाठी आले होते. तेथून दुचाकीने परत जात असताना त्यांच्या अंगावर भेडले माडाचे झाड कोसळले. यात त्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. वैद्यकीय अहवालात चिरडून ठार झाले आहेत असे म्हटले आहे. वैद्यकीय शवविच्छेदन उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले.
याबाबतची माहिती तेथील काही युवकांना कळाली त्यांनी तात्काळ माजी नगराध्यक्ष संजू परब यांना ही माहिती दिली. त्यांनी तात्काळ पालिका व पोलिसांना ही माहिती दिली. त्यानंतर काही वेळातच त्या ठिकाणी पालिकेचा बंब व रुग्णवाहिका दाखल झाली. कटरच्या साह्याने त्या दोघांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू होता. परंतु अंगावर झाडाचा भाग कोसळल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर तब्बल दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर झाडाखाली अडकलेला १ मृतदेह बाहेर काढण्यात आला.