माणूस एकांताला घाबरतो. एकांत माणसाला भयभीत करतो. कारण एकांतातच त्याच्या वास्तविक स्थितीचं प्रतिबिंब त्याला सापडतं. स्वत:च्या चेहऱ्याची सावली त्याच्या दृष्टीला पडते आणि ती फार भीतिदायक असू शकते. म्हणूनच सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आपण स्वत:पासून पळून जाण्याच्या सर्व उपायांचा अवलंब करतो. कुठं स्वत:शी भेट तर घडून येणार नाही ना? कुठं असं तर होणार नाही ना की, आपण स्वत:शी जोडले जाऊ? म्हणून स्वत:पासून पळून जाण्याच्या हजारो युक्त्या माणसाने विकसित करून ठेवल्या आहेत.
गेल्या पन्नास वर्षांतली माणसाची मनोदशा जर आपण समजावून घेतली तर आपल्याला आढळून येईल की, गेल्या पन्नास वर्षांत स्वत:पासून पळून जाण्याच्या जितक्या युक्त्या माणसानं शोधून काढल्या आहेत तितक्या पूर्वी कधीच शोधल्या नव्हत्या. आपले चित्रपटगृह, आपले रेडिओ, आपला टेलिव्हिजन सगळे स्वत:पासून पळून जाण्याचे उपाय आहेत.
माणसाची आंतरिक स्थिती बिघडत चालली आहे आणि म्हणूनच मनोरंजनाचं इतकं संशोधन, थोडय़ा वेळाकरिता स्वत:ला विसरून जाण्याच्या इतक्या व्यवस्थांचं संशोधन तो करीत आहे. जगभर संस्कृतीच्या प्रगतीबरोबरच नशेचे प्रयोगही वाढत चालले आहेत आणि आता तर नशेचे इतके नवनवे प्रकार शोधले गेले आहेत की, युरोप-अमेरिकेत त्यांचा जबरदस्त प्रचार झाला आहे. युरोप-अमेरिकेमधल्या साऱ्या सुसंस्कृत शहरांमधून, साऱ्या सुशिक्षित समाजामधून फार मोठय़ा प्रमाणावर नव्या-नव्या नशांचा शोध घेतला जात आहे.
या सर्वामागं काय कारण असावं? का आपल्याला स्वत:ला विसरावंसं वाटतं? आणि फक्त सिनेमाला जाणारे लोक स्वत:ला विसरतात असं समजू नका, मंदिराकडं जाणारे लोकही याचसाठी मंदिरात जातात! दोघांत काहीच फरक नाही! स्वत:ला विसरून जाण्याचा मंदिर हा जुना उपाय आहे. सिनेमा हा नवा उपाय नाही! एक माणूस बसून रामराम असा जप करतो. तेव्हा तो काही वेगळी क्रिया करतो आहे, असं तुम्ही समजू नका. तो रामराम या शब्दांद्वारे स्वत:ला विसरण्याचा त्याच प्रकारचा प्रयत्न रीत असतो, जो एखादा माणूस फिल्मी गाणे गुणगुणून करीत असतो! दोन्ही गोष्टींत फरक नाही. स्वत:च्या बाहेरच्या कोणत्याही गोष्टीत गुंतण्याचा प्रयत्न, मग तो राम असो, सिनेमा असो, संगीत असो त्याच्या मुळाशी खोल कुठंतरी स्वत:पासून बचाव करण्याच्या प्रयत्नाखेरीज दुसरं काही नसतं.
हे सारं आत्मपलायन चाललंय आणि आपण सारे कोणत्या ना कोणत्या स्वरूपात त्याच्याशी संलग्न झालो आहोत. आपल्या आंतरिक स्थितीमध्ये कमालीचा बिघाड होत चालल्याची ही गोष्ट सूचक आहे आणि तिथं डोकावून पाहण्याच्या साहसाला आपण मुकतचाललो आहोत. तिथं नजर फिरवण्याची आपल्याला भीती वाटते. आपलं वागणं शहामृगासारखं आहे. शत्रू दिसताच शहामृग आपलं तोंड वाळूमध्ये खुपसून उभा राहतो हे तुम्हाला माहीत असेल कदाचित. शत्रू दिसला की त्याला धोका आहे हे समजतं. आणि आपलं तोंड वाळूत खुपसून तो निश्चिंत होतो. कारण आता शत्रू दिसेनासा होतो. तेव्हा जो दिसत नाही तो नसेलच असा तर्क शहामृग करतो.

(साकेत प्रकाशनाच्या ‘ओशो अंतर्यात्रा’ या पुस्तकातून साभार)