03 August 2020

News Flash

मैत्री फक्त रुजवायची असते

ली मैत्री भावनांना आवर घालून शालनने सांगितली

 

‘शक्करकी मिठास थोडी देर जुबानपर रहती है, मगर दोस्तीकी मिठास जिंदगीभर दिल मे रहती है’ असं म्हणतात की, साखरेची गोडी क्षणभरच जिभेवर राहते, पण मैत्रीची गोडी आयुष्यभर मनात राहते. आयुष्यावर पसरून राहते. नि:स्वार्थ भावनेने झालेल्या मैत्रीच्या आठवणी सांगताना आनंद होतो. अशाच गोड आठवणी एकदा एका सेवानिवृत्त परिचारिकेकडून ऐकायला मिळाल्या. तिच्या चेहऱ्यावर आनंद तर कधी औदासीन्य दिसत होतं. तरी निखळ आणि वर्षांनुवर्षांच्या मैत्रीने आयुष्य कसं आनंदाने दोघी मैत्रिणी जगताहेत हे तिने सांगितले.

शालन आणि उषा तिची परिचारिका मैत्रीण यांची चाळीस र्वष असलेली मैत्री भावनांना आवर घालून शालनने सांगितली. उषाने रुग्णसेवेचे व्रत घेतले होते. शालन विवाहित होती. दुर्दैवाने गरोदर असताना नवरा परदेशी गेला तो आलाच नाही. मैत्रीण उषा म्हणाली, ‘‘मी वसतीगृहात न राहता तुझ्या घरी राहायला येते. आपण बाळाला चांगलं मोठं करू या!’’ उषा सकाळी कामाला जाई. शालन घरकाम करून बाळाला सांभाळत असे. रात्री ती कामाला जाई आणि उषा बाळाची देखभाल, इतर कामे करीत असे. सत्तावीस वर्षे आम्ही अशी काढली. बँकांची कामे, घरात लागणारे, बाळाला लागणारे सामान आणणे ही एक कसरत असे. खूप सहजतेने ती सगळं सांगत होती, मैत्रीपुढे त्रास, कष्ट सोपे होतात हेच खरं! शालनचा मुलगा चंदन मोठा झाला. चांगले शिक्षण घेतले होते म्हणून उत्तम नोकरी मिळाली. आपली जोडीदारीण त्याने निवडली. उषाने आता दुसरे घर स्वत:साठी घेण्याचे ठरवले. पण शालन, चंदनने आपण मोठे घर बुक केले आहे, आपण एकमेकांना सोडून राहूच शकणार नाही, हे तिला सांगितले. ‘‘छान सरप्राइज आहे हं!’’ हे सांगताना आलेलं रडू उषाने लपवलं नव्हतं. शालन म्हणाली. ‘‘निवृत्त होईपर्यंत मी रात्रीची डय़ुटी केली. ही सच्ची मैत्री चाळीस वर्षांची

झालीय. दिवसेंदिवस ती जास्त घट्ट, गोडवा वाढवणारी होते आहे.’’

आपल्याला वाटतं पुरुषांना प्रेम, माया या भावना कमी असतात, पण तसं नसतं, ते व्यक्त करण्याच्या त्यांच्या पद्धती वेगळ्या असतात. खूप वेळा ते त्यांच्या कृतीतून दिसते. नोकरीच्या निमित्ताने शहरात आलेली दोन मुले राजीव आणि अनिल यांची अगदी जीवश्च कंठश्च मित्र झाली. बरीच वर्षे एकत्र काम केले, शेजारी राहिले, त्यामुळे मैत्रीतील गोडवा वाढतच गेला. मोरांबा झाला म्हणा ना! पण मध्यंतरी बदलीमुळे दहा बारा वर्षे त्यांना दूर राहावे लागले. मैत्रीचे बंध खूप घट्ट होते, छान, उत्साहदायी आठवणी मनात होत्या, म्हणून निवृत्तीनंतर परत शेजारी राहून मोकळ्या वेळात काही समाजोपयोगी काम करायचे त्यांनी ठरविले. पुरुष मंडळींना निवृत्तीनंतर संतुलित आयुष्य जगण्यासाठी घराबाहेर आवडीचं काम करायला मिळणं महत्त्वाचे असते. छोटय़ा मुलांना पिकनिकला नेणे, स्कॉलरशिप परीक्षेची तयारी करून घेणे ही कामे तर ते आवडीने करतातच, पण रेन वॉटर हार्वेस्टिंग, सोलर सिस्टिम्स यात आपल्या ज्ञानाचा उपयोग आसपासच्या सोसायटीजनांना करून देतात. खूप जुन्या मैत्रीच्या गोडीने त्यांचे आयुष्य आनंदी, गोड झाले आहे. एकमेकांना समजून घेऊन, मदत केल्याने घरातीलच नाही तर आजूबाजूचे, नातेवाईकांचे ते आदर्श झाले आहेत. मैत्री कशी टिकवावी, जुन्या मैत्रीचा गोडवा काय असतो हे या दोघांकडून शिकू या! मैत्री सजवायची नसते, गाजवायची नसते, फक्त रुजवायची असते.

-गीता ग्रामोपाध्ये

geetagramopadhye@yahoo.com

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2016 1:04 am

Web Title: friendship articles
Next Stories
1 चुकीची कबुली
2 कडू घोटांचा गोडवा
3 विद्यार्थी, पालक आणि शिक्षक
Just Now!
X