काही चित्रपट आणि त्यातील संवाद वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. त्यातीलच एक चित्रपट म्हणजे ‘करण-अर्जुन’.. ‘मेरे करण-अर्जुन आएंगे’ हा डायलॉग जणू त्या चित्रपटाची ओळखच बनला. पुनर्जन्माच्या कथेवर आधारित या चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त ‘बॉलिवूड हंगामा’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत या चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश रोशन यांनी बऱ्याच गोष्टी उलगडून सांगितल्या. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर शाहरुख खानने त्यांची माफी मागितल्याचंही राकेश रोशन यांनी स्पष्ट केलं.

‘करण-अर्जुन’ या चित्रपटातील पुनर्जन्माची संकल्पना शाहरुखला पटली नव्हती. फक्त शाहरुखच नव्हे तर ज्यांना कोणाला मी चित्रपटाची पटकथा ऐकवली, सांगितली त्यांना ती संकल्पना पटत नव्हती, असं राकेश रोशन यांनी सांगितलं. याबाबत ते पुढे म्हणाले, “माझे मित्र आणि चित्रपटाच्या टीममधील बरेच लोक मला म्हणाले की प्रेक्षकांना पुनर्जन्माची कथा पटणार नाही. पण मला माझ्या चित्रपटावर पूर्ण विश्वास होता. अभिनेत्यांना कथा पटत नव्हती म्हणून त्यांनी सुरुवातीला चित्रपटातून काढता पाय घेतला. त्यावेळी माझी पहिली निवड सलमान-शाहरुख ही जोडी नव्हती. कथा ऐकून शाहरुखने सुरुवातीला माघार जरी घेतली असली तरी नंतर तोच माझ्याकडे चित्रपट करण्यासाठी स्वत:हून आला. तरी त्याने मला सांगितलं होतं की, तुमच्या सर्व सूचनांचं मी पालन करतो, पण अजूनही माझ्या मनाला चित्रपटाची कथा खटकतेय. जेव्हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा सर्वांनी माझी स्तुती केली. त्यावेळी शाहरुखने माझी माफी मागितली आणि मी योग्य असल्याचं कबूल केलं.”

आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच वर्षी १९९५ मध्ये शाहरुखचा ‘दिलवाले दुल्हनियाँ ले जाएंगे’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि सुरुवातीला हा चित्रपटसुद्धा त्याला आवडला नव्हता. शाहरुखला ज्या दोन चित्रपटांच्या यशाबद्दल विश्वास नव्हता ते दोन्ही चित्रपट ‘ब्लॉकबस्टर’ ठरले.