देशात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेतल्या चार कलाकारांना करोनाची लागण झाल्याची बातमी येत आहे. काही दिवसांपूर्वीच या मालिकेत आत्माराम तुकाराम भिडे ही भूमिका साकारणाऱ्या मंदार चांदवडकर या कलाकाराला करोनाची लागण झाली होती.

या मालिकेच्या सेटवर नव्या नियमांप्रमाणे ११० जणांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. ज्यापैकी चार जणांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, “या मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी या विषयी भाष्य केलं आहे. त्यांनी सांगितलं, बाहेर जाऊन चित्रीकरण करण्याविषयी आम्ही काही विचार केलेला नाही. कारण तीन चार दिवसांपूर्वी जे निर्बंध लावण्यात आले त्यावरुन चित्रीकरण थांबेल असं वाटलं नव्हतं. कारण त्यानुसार सेटवरच्या सर्व लोकांच्या आरटीपीसीआर चाचण्या करणं बंधनकारक होतं. आम्ही त्या केल्या, त्यातले चार जण पॉझिटिव्ह आढळले. पण त्यांना आम्ही आधीच विलगीकरणात ठेवलं होतं.”

ते पुढे म्हणतात, “या चार जणांपैकी काही कलाकार आहेत तर काही तंत्रज्ञ आहेत. पण इतर सर्वांचे करोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आम्ही एरवी चित्रीकऱणादरम्यान सर्व काळजी घेत असतो. जर कोणी थोडं जरी आजारी असेल तरी आम्ही त्याला चित्रीकऱणाला येण्यापासून मनाई करतो. ज्यांना करोनाची लागण झाली आहे, ते सध्या मालिकेत गोली ही भूमिका साकारत आहेत. तर बाकीचे काही तंत्रज्ञ आहेत. मुख्य कलाकार कोणीही नाही. पण जे पॉझिटिव्ह आहेत ते सर्वजण गृह विलगीकरणात आहेत. बाकी सर्वजण सुखरुप आहेत.”

आणखी वाचा- आयसोलेशनमध्ये असून करोनाची लागण कशी झाली? ‘आशिकी’ फेम राहुलचा सवाल

चित्रीकरण थांबवण्याच्या निर्णयावर ते म्हणाले, “आधी सर्व सदस्यांच्या आरटीपीसीआर चाचण्या निगेटिव्ह आल्यानंतर चित्रीकऱणाची परवानगी मिळत होती. पण आता १५ दिवसांसाठी चित्रीकरणावर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. आम्हाला वाटलं होतं की बायो बबलच्या सहाय्याने आम्ही चित्रीकरण करु शकू. पण सरकारच्या निर्णयाशी आम्ही सहमत आहोत. त्यांना परिस्थितीची जास्त जाण आहे. त्यांचा निर्णय सर्वांच्या भल्यासाठीच असेल.”