आमिर खानच्या आगामी ‘दंगल’ या सिनेमाने प्रदर्शनापूर्वीच नवा इतिहास रचला आहे. एका दिवसात सर्वाधिक वेळा पाहण्यात आलेला सिनेमाचा ट्रेलर ठरले आहे. केवळ ६ दिवसांत या ट्रेलरला यू-ट्युबर २१ कोटी वेळा पाहण्यात आले आहे.
हरयाणाचे कुस्तीपटू महावीर सिंग फोगट यांच्या जीवनावर ‘दंगल’ हा सिनेमा आधारित आहे. या सिनेमात आमिर खान महावीर सिंग फोगट यांची भूमिका साकारत आहे. महत्त्वाकांक्षी वडिलांची त्यांच्या मुलींना प्रोत्साहन देण्याची सत्य कथा या सिनेमात साकारण्यात आली आहे. त्याचीच काही झलक या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते.
सुवर्ण पदक मिळवण्याचे स्वप्न आपला मुलगाच पूर्ण करणार अशी आस लावून राहिलेल्या महावीर सिंग फोगट यांच्या पत्नीच्या पदरी चारही मुलींचाच जन्म होतो. पण त्यांच्या गीता आणि बबिता या दोन्ही मुली काही मुलांपेक्षा कमी नाहीत याची जाणीव महावीर सिंग फोगट यांना झाल्यानंतर या दोन्ही मुलींना कुस्तीसारख्या मर्दानी खेळामध्ये उतरवत त्यांना या खेळासाठी तयार करण्यासाठी महावीर सिंग फोगट यांनी घेतलेली मेहेनत या साऱ्याची झलक या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे.
या सिनेमासाठी आमीरने चांगलीच मेहनत घेतली आहे. हरयाणवी बोलीभाषा आत्मसाद करुन आपण परफेक्टनिस्ट आहोत याची ओळख त्याने पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांना दिली आहे. त्याच्या मुली गीता व बबिता या भूमिका साकारणारी सना शेख व सान्या मल्होत्रा या देखील आपल्या भूमिकेत शोभल्या आहेत. सर्वात कमी दिवसांत सर्वाधिक पाहिला जाणारा ट्रेलर म्हणून ‘दंगल’चा उल्लेख केला जात आहे.
या ट्रेलरमधले डायलॉगही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. ‘म्हारी लडकीया छोरो रे कम हे के’ या टॅगलाईनला फॉलो केले जात आहे. केवळ एक सिनेमा म्हणून नव्हे तर महिला सबलीकरणाचा एक महत्त्वाचा भाग म्हणूनही ‘दंगल’ सिनेमाकडे पाहिले जात आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 26, 2016 6:36 pm