बॉलिवूडचा मि.परफेक्शनिस्ट आमिर खानच्या ‘पीके’ला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्यानंतर चीन आता त्याच्या ‘दंगल’ चित्रपटाचे स्वागत करण्यास सज्ज झाला आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट चीनमध्ये तब्बल ९००० स्क्रिन्सवर प्रदर्शित होणार आहे. आजपर्यंत कोणताच भारतीय चित्रपट इतक्या मोठ्या प्रमाणात भारताबाहेर प्रदर्शित करण्यात आलेला नाही. इतकंच काय पण भारतातही कोणताच चित्रपट ९००० स्क्रिन्सवर प्रदर्शित झालेला नाही. त्यामुळे ‘दंगल’च्या नावे आता आणखी एक विक्रम नोंदवला गेला आहे.

चीनमध्ये ‘दंगल’ चित्रपट ९००० स्क्रिन्सवर प्रदर्शित केला जाईल. आजवर परदेशात कोणताच भारतीय चित्रपट एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रदर्शित झालेला नाही, असे डिस्ने इंडियाच्या सहनिर्मात्या अमृता पांडे म्हणाल्या. चीनमध्ये हा चित्रपट ‘शुई जिओ बाबा’ म्हणजेच ‘लेट्स विसल डॅड’ या नावाने प्रदर्शित होईल. गेल्याच महिन्यात दिग्दर्शक नितेश तिवारी आणि अभिनेता-निर्माता आमिर खान चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी चीनला गेले होते. ‘बीजिंग इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’मध्येही ‘दंगल’ दाखविण्यात आला होता. ‘दंगल’ चित्रपट गीता आणि बबिता फोगाट या भारतीय कुस्तीपटूंच्या आयुष्यावर आधारित असून, आमिरने यात त्यांच्या वडिलांची म्हणजेच कुस्तीवीर महावीर फोगट यांची व्यक्तिरेखा साकारली आहे. या चित्रपटावर समीक्षकांनी तसेच प्रेक्षकांनीही कौतुकाचा वर्षाव केला होता.

‘दंगल’ला पाकिस्तानमध्येही प्रदर्शित करण्याची परवानगी मिळाली होती. या चित्रपटाबाबत पाकिस्तान सेन्सॉर बोर्डाला कुठलाही आक्षेप नव्हता. परंतु, भारताचे राष्ट्रगीत आणि राष्ट्रध्वज चित्रपटात दाखवता येणार नसल्याचे त्यांचे म्हणणे होते. त्यावर राष्ट्रगीताशिवाय हा चित्रपट पाकिस्तानमध्ये प्रदर्शित होणार नाही, असे आमिरने ठणकावून सांगितले होते.

याआधी आमिरचे ‘पीके’, ‘थ्री इडियट्स’ आणि ‘धूम ३’ हे चित्रपट चीनमध्ये तब्बल ४००० स्क्रिनवर प्रदर्शित झाले होते. या चित्रपटांपैकी ‘पीके’ने सर्वाधिक १४० कोटींचा गल्ला जमविला होता. तर इतर दोन चित्रपटांनाही चांगला प्रतिसाद मिळाला होता.