अभिनेता मकरंद अनासपुरे यांची खंत

‘मी भारतीय माणूस असून अलीकडे इंडियात राहतो. पण मला भारताच्या समस्या समजतात. महासत्तेच्या गोष्टी करत असताना व्यवस्थेत विपर्यास आहे. देदीप्यमान इतिहास असणाऱ्या भारत देशाचा वर्तमान केविलवाणा कसा,’ अशी खंत प्रसिद्ध अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केली.

अभिजित कदम मेमोरियल फाउंडेशनकडून देण्यात येणारा ‘अभिजितदादा कदम मानवता पुरस्कार’ माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते नाम फाउंडेशनला आणि व्यक्तिगत पातळीवरील पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते राजेश काची यांना प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात अनासपुरे बोलत होते. भारती विद्यापीठाचे संस्थापक आणि माजी मंत्री पतंगराव कदम, कार्यकारी विश्वस्त विश्वजित कदम, अस्मिता जगताप यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.

अनासपुरे म्हणाले,‘‘ शेतकरी ते ग्राहक यांमधील अडथळे नाहिसे झाले तरच शेतकऱ्यांना मदत होईल. पुढील महिन्यात शहीद जवानांच्या कुटुंबाकरिता मोठा कार्यक्रम नामकडून घेण्यात येणार आहे. आपण केवळ इतिहासातच रमतो. देशात पूर्वी कधी तरी सोन्याचा धूर निघायचा. आता व्यसनांचा धूर निघतो हे मात्र आपण सांगत नाही; याचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.’’

दूरचित्रवाणी आणि वर्तमानपत्रांतील जाहिरातींमधून अच्छे दिन आले आहेत. पण खरे अच्छे दिन येण्यासाठी काची, अनासपुरे अशा माणसांची गरज आहे, असे पतंगराव कदम म्हणाले.

राणे म्हणाले,की सरकारी कामांना मर्यादा असतात. त्यामुळे सामाजिक मदत करताना व्यक्तींना, सामाजिक संस्थांना मदत करा किंवा स्वत: सामाजिक कामात उतरा. कोणतेही काम करताना राजकारण्यांचा राजकीय स्वार्थ असतो. मात्र, ‘नाम’सारख्या संस्था सामाजिक काम राष्ट्रीय कर्तव्य म्हणून करतात.

कॉर्पोरेट ऑफिसमधून किंवा बँकेच्या कर्जाबाबत किंवा अन्य काही माहिती घेण्यासाठी जेव्हा आपल्याला मोबाईल कंपन्यांचे फोन येतात तेव्हा त्यांच्या प्रतिनिधींशी आपण मराठीतच बोलले पाहिजे. आपण आग्रहाने मराठी बोललो तरच मराठी मुलांना तेथे रोजगार मिळेल, असेही मकरंद अनासपुरे यांनी मराठी दिनानिमित्त उपस्थितांना सांगितले.