‘जंजिर’ चित्रपटाच्या रिमेककडून जास्त अपेक्षा नसल्याचे  राम चरण तेजाने म्हटले आहे. अमिताभच्या ‘जंजिर’ला मिळालेल्या यशाच्या दहा टक्के यश या रिमेकला मिळेल अशी आशा त्याने व्यक्त केली. १९७० मधील जंजिर चित्रपटात अमिताभने केलेली भूमिका या रिमेकमध्ये राम चरण तेजा साकारत आहे.
मला या चित्रपटाकडून जास्त अपेक्षा नसून, ‘जंजिर’च्या रिमेकमध्ये बच्चन साहेबांची भूमिका साकारताना मला खूप दडपण होतं. ही भूमिका करणे माझ्यासाठी कठीण होतं. जेव्हा तुम्ही अशा प्रकारचा चित्रपट स्विकारता, त्यावेळी निश्चितच तुम्ही एकप्रकारचे दडपण अनुभवत असता जे तुम्हाला गंभीर, शिस्तबध्द आणि जबाबदार बनवते. जे माझ्यासाठी फायद्याचे ठरले असे राम चरण म्हणाला.
‘जंजिर’ चित्रपटात अमिताभने साकारलेल्या विजय खन्ना या धाडसी पोलिस अधिका-याच्या भूमिकेने त्याला अॅन्ग्री यंगमॅन म्हणून प्रसिध्दी मिळवून दिली. या चित्रपटाच्या निमित्ताने अमिताभला त्याचा पहिला ब्लॉकबस्टर चित्रपट मिळाला.
रिमेकच्या पहिल्या दिवसाच्या चित्रीकरणाच्या दिवशी या महानायकाला भेटण्याची संधी रामचरणला मिळाली.
आम्ही दोघेही एकाच ठिकाणी चित्रीकरण करत असल्याने योगोयोगाने चित्रपटाच्या शुटिंगच्या पहिल्या दिवशी बच्चन साहेबांची आणि माझी भेट झाली. मी त्यांची भूमिका साकारत असल्याने जरा घाबरलेला होतो. मला त्यांच्या प्रतिसादाचा अंदाज नव्हता, परंतु ते अतिशय शांत होते. असे राम म्हणाला.
तो पुढे म्हणाला, त्यांच्या आशिर्वादामुळे चांगला अभिनय करण्यासाठी उर्जा मिळते. मी त्याच्याकडे कोणत्याही प्रकारच्या  युक्तीची अथवा सल्लाची मागणी केली नाही. मला अस वाटलं की ते स्वत: काहीतरी सांगतील. परंतु ते तशाप्रकारचे व्यक्ति नसून, ते आपले ज्ञान वाटत नाहीत. त्यानी मला शुभेच्छा दिल्या.
‘जंजिर’ चित्रपटाला तेलंगणामध्ये विरोध होत असलेल्या वृत्ताचे रामने खंडण केले. तो म्हणाला, सर्व काही ठिक चालले असून तेथे काही प्रमाणात लोकांमध्ये मनस्ताप आहे. परंतू लवकरच सर्व काही ठीक होईल अशी आम्हाला आशा आहे. याचा परिणाम चित्रपटाच्या प्रदर्शनावर होणार नाही.