सध्या संपूर्ण देशात लॉकडाउनमुळे मालिका आणि चित्रपटांचे चित्रीकरण बंद ठेवण्यात आले. तर दुसरीकडे छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय आणि चर्चेत असणारा शो म्हणजे ‘कौन बनेगा करोडपती पर्व १२’चे ऑनलाईन रेजिस्ट्रेशन सुरु झाले आहे. ९ मे पासून केबीसीचे ऑनलाईन रेजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. नुकताच या शोमध्ये सहभागी होण्यासाठी स्पर्धकांना पहिला प्रश्न विचारण्यात आला आहे.

शोचे सूत्रसंचालक, बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी अनोख्या पद्धतीने कौन बनेगा करोडपती पर्व १२मधील रेजिस्ट्रेशनसाठी पहिला प्रश्न विचारला आहे. तसेच हा प्रश्न सध्या जगभरात करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर आधारित आहे.

सोनी वाहिनीने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर बीग बींद्वारे केबीसी १२च्या रेजिस्ट्रेशनसाठी विचारलेल्या प्रश्वानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये, ‘आज काल लोकं मला फार प्रश्न विचारतात. जसं की, केबीसी यंदा येणार कि यावर्षी सुट्टी घेणार. या वेळी काय वेगळं ऐकायला मिळणार? “लॉक किया जाय” कि “लॉकाडउन किया जाय” हॉटस्पॉटच्या परिस्थितीमध्ये हॉटसीट पहायला मिळणार.. इतक्या मोठ्या घटनेने देश थांबला नाही, तर हा खेळ कसा थांबेल. मी अमिताभ बच्चन कौन बनेगा करोडपती घेऊन येत आहे तुमच्या भेटीला आणि हा रेजिस्ट्रेशनसाठी पहिला प्रश्न’ असे त्यांनी व्हिडीओमध्ये म्हटले आहे.

केबीसीमध्ये सहभागी होण्यासाठी स्पर्धकांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन रेजिस्ट्रेशन करावे लागते. नुकताच अमिताभ यांनी स्पर्धकांना रेजिस्ट्रेशन करण्यासाठी करोनावर आधारित पहिला प्रश्न विचारला आहे. २०१९मधील कोविड-१९ किंवा करोना व्हायरस या आजाराची ओळख चीनमध्ये सर्वात पहिले कोणत्या शहरात झाली? त्यासाठी A. शेंझो, B. वुहान, C. बीजिंग आणि D. शंघाय हे पर्याय देण्यात आले आहेत. तुम्ही या प्रश्नाचे उत्तर आज म्हणजे १० मे रात्री ९ वाजेपर्यंत देऊ शकता.