जम्मू-काश्मीरच्या हंदवाडामध्ये दहशतवाद्यांशी दोन हात करताना २१ राष्ट्रीय रायफल्स युनिटचे कमांडिंग ऑफिसर कर्नल आशुतोष शर्मा शहीद झाले. दहशतवादविरोधी मोहिमांमध्ये त्यांनी नेहमीच आघाडीवर राहून नेतृत्व केले होते. त्यामुळे त्यांच्या निधनाचं वृत्त समोर आल्यानंतर देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात आली. यामध्येच बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांनी शोक व्यक्त केला आहे.

अमिताभ बच्चन सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय असून अनेक वेळा समाजात घडणाऱ्या घटनांवर ते व्यक्त होत असतात. अलिकडेच हंदवाड्यात दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत कर्नल आशुतोष शर्मा शहीद झाले. याविषयी बिग बींनी ट्विट केलं असून त्यांच्या कार्याला सलाम केलं आहे.

”अलिकडेच झालेल्या चकमकीतील शहीदांचे मन हेलावून टाकणारे फोटो पाहिले. देशासाठी त्यांनी जे बलिदान दिलं, त्यासाठी मनापासून त्यांच्या अभिमान वाटतो. जय हिंद आणि मनापासून सलाम”, अशा आशयाचं ट्विट बिग बींनी केलं.

दरम्यान, ३ मे रोजी जम्मू- काश्मीर येथील हंदवाडामध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवादी यांच्यात चकमक झाली. दहशतवादी घुसलेल्या भागात राहणाऱ्या लोकांना बाहेर काढण्यासाठी लष्कराचे ५ जवान आणि जम्मू-काश्मीर पोलीस दलातील एक जवान अशा सहा जणांची टीमने इथं प्रवेश केला. इथं लपून बसलेल्या दहशतवाद्यांना जवानांची चाहूल लागल्याने त्यांनी मोठ्या प्रमाणावर गोळीबार सुरु केला. जवानांनीही याला जोरदार प्रत्युत्तर दिलं. यामध्ये दोन दहशतवादी ठार झाले. मात्र, आपल्या दोन लष्करी अधिकाऱ्यांसह दोन जवान आणि एक जम्मू-काश्मीर पोलीसांचे सब इन्पेक्टर असे पाच जण शहीद झाले.