अभिनेत्री नेहा धुपिया आणि अंगद बेदी ही जोडी बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. या दोघांनी गुपचूपपणे लग्न केल्यामुळे कलाविश्वासह चाहत्यांमध्ये त्यांची प्रचंड चर्चा रंगली होती. परंतु नेहासोबत लग्न करण्यापूर्वी अंगद अभिनेत्री नोरा फतेहीला डेट करत होता. मात्र काही कारणास्तव अंगद आणि नोराचा ब्रेकअप झाला. अंगदने एका मुलाखतीमध्ये त्यांच्या ब्रेकअपमागील कारण स्पष्ट केलं आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अंगदने नोरा फतेहीसोबतच्या नात्यावर मोकळेपणाने चर्चा केली. त्यासोबतच त्यांचं नात कसं होतं आणि त्यांचा ब्रेकअप कसा झाला हेदेखील त्याने सांगितलं.

“प्रत्येक नात्याला एक खास महत्व असतं. काही नाती अशी असतात जी अनंत काळापर्यंत टिकून राहतात. तर काही नाती ही फार कमी कालावधीसाठी जोडली जातात. खरंतर प्रत्येकालाच असं वाटतं की त्यांचं नात हे कायम चांगलं असावं, ते टिकून रहावं. त्यामुळे रिलेशनशीपमध्ये असलेला प्रत्येक व्यक्ती हे नातं जपण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र अनेक प्रयत्न करुनही काही नाती टिकत नाहीत”, असं अंगद म्हणाला.

पुढे तो म्हणतो, “जर माझ्या आणि नोराच्या नात्याविषयी सांगायचं झालं तर, नोरा एक अत्यंत चांगली मुलगी आहे.ती तिच्या करिअरमध्ये यश संपादन करत आहे. त्यामुळेच ती तिच्या कामामध्ये यशस्वी ठरत असून चाहत्यांमध्येही ती लोकप्रिय आहे. मला वाटतं की नोराला असा पती मिळावा जो तिच्या योग्यतेचा असेल आणि तो लवकरच तिला मिळेल. प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ यावी लागते”.

दरम्यान, अंगदचा नोरासोबत ब्रेकअप झाल्यानंतर अंगदने अभिनेत्री नेहा धुपियासोबत लग्न केलं. विशेष म्हणजे नेहा लग्नापूर्वीच प्रेग्नंट असल्यामुळे त्यांनी गुपचूप लग्न केल्याची चर्चा होती.