|| शुद्धोदन आहेर    

भारतातील जातिसंस्थेच्या वास्तवापासून प्रस्थापित कलाक्षेत्राने नेहमीच सुरक्षित अंतर राखले आहे. तथापि, सध्या जातिप्रश्नाच्या अरिष्टाने उभ्या देशाला वेढले असताना व त्यातील अमानुषता अनेकविध नाटय़े घडवीत असताना ‘सोवळे’ कलाक्षेत्रदेखील त्यापासून अलिप्त राहणे शक्य नाही. सर्व कलांचा सर्वोत्कृष्ट संगम होणाऱ्या चित्रपट माध्यमाद्वारे नुकताच प्रदर्शित झालेला अभिनव सिन्हा दिग्दर्शित ‘आर्टिकल १५’ हे त्याचे जिवंत उदाहरण आहे!

तथागत सम्यक संबुद्धप्रणीत अनित्यता सिद्धांतानुसार, जातिसंस्थेने चिरफळ्या केलेल्या भारतीय समाजाचा विकासही विषम झाला आहे. स्वातंत्र्योत्तर कालात औद्योगिकीकरणाभावी उत्तर भारतातील खेडय़ापाडय़ांत जुन्या सरंजामशाहीचे घट्ट रुजलेले पाश, संविधानाने दिलेल्या अवकाशात अटीतटीने जीवनसंघर्षांची लढाई लढणारे दलित, आपले जातिवर्चस्व टिकविण्यासाठी जुन्या शासकांनी नव्या संविधानातील व्यापलेला अवकाश व डावपेच, जातिसंस्थेचे प्रशासनात पडलेले प्रतिबिंब अशी व्यापक चौकट लेखक दिग्दर्शकाने निवडली आहे. या व्यामिश्र पाश्र्वभूमीवर आधुनिक युरोपीय मूल्यांशी चिरपरिचित झालेला व पित्याच्या इच्छेखातर भारतीय पोलीस सेवेत आलेल्या उच्चजातवर्गीय अयानच्या ‘नजरेतून’ साकारणारी ही कथा आहे. मानवाधिकार-लिंगभेद या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या प्रेयसीच्या प्रेमात स्वत:ला शोधणाऱ्या अयानला सेवेतील पहिल्या काही दिवसांचे विदारक अनुभव अस्वस्थ करतात. जसे जातीव्यवस्थेने बरबटलेल्या समाजव्यवस्थेतील चांगदेव पाटीलचे परात्मीकरण वाचकांना अस्वस्थ करते, तसेच अयानचे अस्वस्थ होणेदेखील प्रेक्षकांना विचारप्रवृत्त करते. या चित्रपटाचे हे सर्वात मोठे यश आहे.

लालगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वरिष्ठतम अधिकारी म्हणून सेवेत रुजू झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी आपल्या कथानायकाच्या कार्यक्षेत्रात दोन अल्पवयीन चुलत बहिणींचा फाशी घेऊन मृत्यू झाल्याची दुर्घटना घडते व एक मुलगी बेपत्ता होते. मृत मुलींमध्ये समलिंगी संबंध असल्याने घराण्याची अब्रू जाऊ  नये म्हणून पित्यांद्वारेच त्यांची हत्या केली जाते, असे ब्रह्मदत्त सिंग हा हाताखालचा अधिकारी अयानला सांगतो. सुरुवातीला अयान या प्रकरणाकडे फारसे गांभीर्याने पाहत नाही. तथापि, त्याला भेटण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका ‘शिष्टमंडळाची’ देहबोली व त्याच्या प्रेयसीचे याबाबतचे अभिप्राय यामुळे तो या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करतो व ‘संतुलन’ बिघडते!

वरकरणी पाहता, चित्रपटाचा केंद्रबिंदू अयानचा पोलीस तपास हा असला तरी खरा केंद्रबिंदू आंबेडकरवादी निषाद व हिंदुत्वाच्या चौकटीत ‘दलित-ब्राह्मण एकता’ करू पाहणारी संघटना यांतील संघर्ष हा आहे. अयानच्या आगमनापूर्वीच त्यांनी आपापले पत्ते फेकले आहेत. दलित-ब्राह्मण ऐक्य करू पाहणारे महंत एक मोठी परिषद घेऊ  पाहात आहेत व त्यासाठी ‘समविचारी’ दलितांना त्यांनी हाताशी धरले आहे. त्यांच्यामार्फत दलित-ब्राह्मण सहभोजनाचा जाहीर कार्यक्रमही घेतला जातो. प्रतिशह म्हणून निषादने सर्व मागासवर्गीयांना तथाकथित उच्चजातीयांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. अशा तापलेल्या वातावरणात दोन दलित मुली फासावर लटकल्याचे प्रकरण घडते व आगीत तेल ओतले जाते.

दरम्यान, मृत बहिणींच्या नातेवाईकांचे शिष्टमंडळ अयानला भेटते व त्याच्या तपासाला नवी दिशा मिळते. शवविच्छेदन अहवालासाठी शासकीय दवाखान्यात गेल्यावर खऱ्या अहवालात फेरफार झाल्याचेही त्याला समजते. या तपास प्रक्रियेत सैतानी जातिसंस्थेने समाजात माजविलेला कहर व जातीच्या चिखलात यथेच्छ बरबटलेले पोलीस प्रशासन पाहून वेगळ्याच देशात वावरणारा देशप्रेमी कथानायक भानावर येतो व भारतीय संविधानातील ‘अनुच्छेद १५’ मार्फ त स्वत:चा शोध घेण्याचा यशस्वी प्रयत्न करतो!

निषादचा बहिष्कार मागे घेण्यासाठी अयानने केलेला प्रयत्न या कथानाटय़ाला निर्णायक वळण देतो. प्रत्यक्ष भेटीत प्रतिभाशाली दलित नायक निषाद आय पी एस अयानला संविधानाच्याच मुद्दय़ावर निरुत्तर करतो. मग निरुत्तरित अयान पूजाच्या, बेपत्ता तिसऱ्या मुलीच्या शोधासाठी निषादला सहकार्य करण्याचे भावनिक आवाहन करतो. पूजा ही निषादची प्रेयसी असलेल्या गौराची धाकटी बहीण आहे. असे भावनिक पेच चळवळीतील कार्यकर्त्यांच्या पाचवीला पुजलेले असतात. बाजूला बसलेल्या गौराकडे एक कटाक्ष टाकून निषाद अयानला मर्यादित सहकार्य देऊ  करतो. त्या सहकार्याच्या आधारे अयान पूजाचा शोध लावतो व निलंबित होऊ नही खऱ्या दोषींना गजाआड करतो. मात्र विश्राम बेडेकरलिखित ‘रणांगण’मधील परागंदा ज्यू समाजाप्रमाणे जगण्याची सक्ती झालेला, विज्ञान कथालेखक होण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणारा, इच्छा असूनही प्रेयसीला साधी फुलेही कधी भेट न देऊ  शकणारा भावनोत्कट निषाद या जातिसंगरात शहीद होतो. जीवनाच्या अंतिम क्षणी छातीवर गोळ्या झेलतानाही उज्ज्वल भविष्याची शाश्वती देणाऱ्या व मिशीवर पीळ देत रडू कोसळलेल्या आपल्या सहकाऱ्याचे मनोबल उंचावणाऱ्या आंबेडकरवादी निषादचे पात्र दिग्दर्शकाने  सहृदयतेने रेखाटले आहे. आज सुरक्षित मध्यमवर्गीय जीवन जगणाऱ्या अनुसूचित जाती-जमाती-ओबीसींच्या विकासात निषादसारख्या ज्ञात-अज्ञात कार्यकर्त्यांच्या रक्तांश्रूंचे योगदान आहे!

गौरा-निषाद व आदिती-अयान या दोन जोडप्यांचे प्रगल्भ संबंध हा या चित्रपटाचा आणखी एक महत्त्वपूर्ण पैलू आहे. अयानने स्वत:ला शोधावे, असा आदितीचा रास्त आग्रह आहे. तथापि, त्याच्या भावनिक सहाऱ्याची गरज ओळखून बंडखोर विचारांची ही बुद्धिमान नायिका स्वत:हून त्याला भेटायला जाते. दुसरीकडे निषादच्या ध्येयनिष्ठेवर जीव ओवाळून टाकणारी गौरा संकटांची मालिका झेलूनही कोसळून जात नाही. एकविसाव्या शतकातील भारतीय महिलांच्या या गुणवत्तेला न्याय देण्याइतपत भारतीय समाज विकसित झाला आहे काय? नवा भारत निर्माण होण्याची इच्छा धरणाऱ्या प्रत्येकाने या प्रश्नाचे उत्तर शोधणे आवश्यक आहे.

इंग्रज राजवटीत उत्पादकता व आधुनिक मूल्ये या दोन्ही स्तरांवर कालबाह्य़ झालेली सैतानी जातिसंस्था आज निव्वळ जातिसंस्थासमर्थक ब्राह्मणांमुळे जिवंत राहिलेली नाही. खेडय़ापाडय़ांत प्रभुत्वशाली शेतकरी जातींना किमान श्रममूल्यांत मनुष्यबळ हवे असल्याने व तथाकथित कनिष्ठ जातीजमातींमधून अशा मनुष्यबळाचा पुरवठा होत असल्याने जीर्णशीर्ण जातिसंस्था टिकविण्याची जबाबदारी आता स्वत:चे क्षत्रियत्व स्वमुखाने अधोरेखित करणाऱ्या ब्रह्मदत्त सिंगनेदेखील स्वीकारली आहे. मंदिरात जेवणाऱ्या दलितांना के लेल्या अमानुष मारहाणीचे समर्थन करणाऱ्या, मृत मुलींचे शवविच्छेदन करणाऱ्या अनुसूचित जातीच्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्यावर दबाव टाकून खोटा अहवाल तयार करून घेणाऱ्या, समान पदावरील परंतु जातिसंस्थेच्या उतरंडीत आपल्याहून खाली असणाऱ्या जाटव अधिकाऱ्याशी जातीय गुर्मीने वागणाऱ्या, व्यवस्थेचा कडवा आधारस्तंभ असलेल्या अंशुमन आर्याचा स्वत:च्या सुरक्षिततेसाठी सहजपणे काटा काढणाऱ्या, वरिष्ठ अयानशी लाडीगोडीने वागणाऱ्या व वेळप्रसंगी ‘संतुलन’ बिघडल्याची ‘सविनय’ जाणीव करून देणाऱ्या ब्रह्मदत्त सिंगचे पात्र हे या व्यवस्थेतील साहाय्यक खलनायकाचे नीट प्रतिनिधित्व करते.

राखीव जागांच्या साहाय्याने प्रगती साधणारा व प्रस्थापितांची तळी उचलणारा ‘जाटव’, अनिच्छेने दबावाला बळी पडणारी महिला डॉक्टर, हे दोघेही व्यवस्थेचा पाठिंबा मिळताच ‘संविधान चालवू शकतात’, असाही एक संदेश या चित्रपटाने दिला आहे. तसेच ‘वर की खाली’ या गोंधळात आपली भूमिका निश्चित न करू शकल्याने चिरडला गेलेला निहाल सिंग जाट व राजपूत असूनही माईच्या आध्यात्मिक प्रभावात राहणारा वाहनचालक हेदेखील परिवर्तनास साहाय्यभूत ठरू शकतात. थोडक्यात, परिवर्तनासाठी बाहेरून दबाव आणणारा समाज व त्याला विधायक प्रतिसाद देणारे प्रशासन यांच्या एकत्रित सहकार्यातून संविधानाची अंमलबजावणी करता येऊ  शकते, हे प्रभावी संवाद असलेल्या या चित्रपटाचे सार आहे. याशिवाय भावनांची देवाणघेवाण करताना समाजात होत असणारा सोशल मीडियाचा वापर, यांचाही दिग्दर्शकाने उपयोग केला आहे.

शेवटी दिग्दर्शकाच्या जातीय जाणीवनेणिवेचा उल्लेख करणे अपरिहार्य आहे. अभिनव सिन्हा हे नावावरून तरी कायस्थ वाटतात. ब्राह्मणी धर्मशास्त्राप्रमाणे कायस्थ हे शूद्र आहेत. मागील शतकाच्या अगदी सुरुवातीला लढल्या गेलेल्या ‘ब्राह्मण-ब्राह्मणेतर’ वादात कायस्थांनी ब्राह्मणेतर बाजू हिरिरीने लढविल्याचे दिसते. त्यामुळे हिंदी पट्टय़ात निकराला आलेला जातिसंघर्ष एका कायस्थाने टीपकागदाप्रमाणे अलगद टिपून चित्रपटमाध्यमाद्वारे सादर करणे, यात अस्वाभाविक असे काहीच नाही. जेव्हा प्रस्थापित कलाकारांची प्रतिभा नावीन्याअभावी कुंठते तेव्हा सर्जनशील कलावंत समाजवास्तवाच्या मातीतून जीवनरस शोषतात. त्यातून त्यांच्या प्रतिभेला नवा बहर येतो. अभिनव सिन्हांनी नेमके तेच केले आहे. अयानचा साहाय्यक म्हणून कार्यरत असणाऱ्या मयांकच्या माध्यमातून त्यांनी कायस्थ पात्राचे चित्रणही तटस्थपणे केले आहे. दलित दिग्दर्शक पा रंजीत ‘काला’ चित्रपटातील जातिसंघर्ष चितारताना कलात्मकता व नाटय़ातिरेक यांकडे झुकतो, तर कायस्थ दिग्दर्शक ‘आर्टिकल १५’ मधील जातिसंघर्ष चितारताना मात्र वास्तववादाकडे झुकतो, हा विरोधाभासही लक्षणीय आहे! ‘बडे बडे लोगों के बंगला दो बंगला..’ या चळवळीतील सुप्रसिद्ध गाण्यापासून सुरू झालेल्या या कथेचा शेवट ‘वैष्णव जन तो..’ या महात्मा गांधींच्या आवडत्या भजनाच्या बिघडलेल्या लयीने होतो. ही बिघडलेली लय गांधीवादाने जातीप्रश्नाबाबत सूरताल गमावल्याचे सांगते. असह्य़ दु:खद वळणे घेत सुखांतिकेच्या बिंदूवर आलेला भुकेलेला कथानायक आपल्या सहकाऱ्यांसह हमीदपूरच्या रस्त्यावर भोजनाचे बिऱ्हाड टाकलेल्या माईला जेवणाची ऑर्डर देतो व मिश्कीलपणे ‘जात’ विचारतो. माईदेखील जात सांगते, पण एकाएकी आलेल्या ट्रकच्या आवाजात तिचे उत्तर दबून जाते. या दृश्यातील, दळणवळण-औद्योगिकीकरणामुळे जात जाईल, हा संकेतार्थ आंबेडकरवादास पूरक आहे. परंतु ‘वैष्णव जनच्या’ बिघडलेल्या सुरावटीसह हा संकेतार्थ विचारात घेतल्यास दिग्दर्शक गांधीवाद व आंबेडकरवाद यांच्या मिलनाकडे अंगुलिनिर्देश करतो आहे, असे जाणवते. तथापि, कोणत्याही नायकाची वाट न बघता सर्व भारतीयांनी आपापल्या कार्यक्षेत्रात सैतानी जातिसंस्थेच्या विरोधात अयान रंजनसारखीच ठाम भूमिका घ्यायला हवी, असा संदेश देणारा ‘आर्टिकल १५’ हा चित्रपट संविधानातील मूल्यांचे महत्त्व पटवून देण्यात यशस्वी ठरतो, हे निर्विवाद!