नीलेश अडसूळ

एखादी जोडी पाहून आपलेही नाते असे असावे, असे प्रत्येकाला वाटतेच. त्यातही मालिकांचा प्रभाव वेळोवेळी जाणवत आला आहे. मालिका या काल्पनिक असल्याने तिथे तयार झालेली नाती तिथेच रुजतात आणि लोपही पावतात. काही अपवाद वगळता वर्षांनुवर्षे त्या मालिका पुढे नेणारे कलाकारही त्या आभासी जगातून बाहेर पडतात. पण लेखक, दिग्दर्शक आणि कलावंतांनी उभ्या केलेल्या त्या भावविश्वातील रुजवात प्रेक्षकांच्या मनात मात्र चिरंतन राहते. अगदी मालिकांच्या पूर्णविरामानंतरही. ‘व्हॅलेंटाइन डे’च्या निमित्ताने प्रेमाचे असे खास क्षण आणि जोडय़ा रसिकांच्या मनात रुजवणाऱ्या या काही मालिकांचा हा वेध..

‘सांगू कशा मी तुला सख्यारे माझ्या या भावना.. माझिया प्रियाला प्रीत कळेना..’ या गीताने आणि मालिकेने अनेकांना वेड लावले. आदर्श सून, आदर्श सासू अशा चौकटी आखणाऱ्या मालिका जगतात झी मराठीवरील या मालिकेने ‘शमिका आणि अभिजीत’ अशी आदर्श जोडी घडवली. मृणाल दुसानीस आणि अभिजीत खांडकेकर या नव्या दमाच्या कलाकारांनी अक्षरश: जीव ओतून काम केले. आज हे दोघेही कलाकार म्हणून ज्या उंचीवर आहेत त्यातला महत्त्वाचा वाटा या मालिकेचा आहे, असे म्हणणे खोटे ठरणार नाही. आजही या मालिकेचे शीर्षक गीत प्रत्येकाच्या ओठी असेल. प्रेम-लग्न-संसार या तुमच्या-आमच्या आयुष्यात घडणाऱ्या समीकरणातील प्रत्येक बारकावे या मालिकेने टिपले. अंगावर रोमांच ते डोळ्यात पाणी आणण्यापासून मालिकेत घडलेले अनेक प्रसंग आजही लोकांना मुखोद्गत आहे. म्हणून ‘व्हॅलेंटाइन डे’च्या निमित्ताने या मालिकेची पहिल्यांदा आठवण आल्याशिवाय राहात नाही. आजही अनेकांच्या मोबाइलवर या मालिकेचे शीर्षकगीत रिंगटोनच्या रूपात खणखणताना ऐकू  येते.

प्रेमाची अनेक रूपे या वाहिन्यांनी आजवर उलगडली. अशीच आणखी एका प्रेमाची गोष्ट स्मरणीय ठरली ती म्हणजे ‘घना आणि राधा’ची. एकास एक बढकर पात्र, हास्य-विनोद आणि त्यातून साकारलेली ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ खरोखरच आगळीवेगळी ठरली. स्वप्निल जोशी, मुक्ता बर्वे, विनय आपटे, इला भाटे, स्पृहा जोशी, लीना भागवत सगळे कलाकार आणि त्यांनी वठवलेल्या भूमिका आजही आठवतात. ही मालिका पुन्हा सुरू केली तर कदाचित तितकाच प्रतिसाद आजही मिळेल. स्वप्निल जोशी आणि मुक्ता बर्वे ही जोडी या मालिकेआधीच लोकप्रिय झाली होती, मात्र आजही ही जोडी तितकीच लोकप्रिय आहे आणि याचं श्रेय बहुतांशी घना आणि राधाच्या गोष्टीला जातं.

‘रेशीमगाठी’, ‘का रे दुरावा’, ‘काहे दिया परदेस’, ‘होणार सून मी या घरची’ याही मालिकांनी कुठे मध्यमवर्गीय प्रेम, आर्थिक तफावत असलेल्या दोघांचे प्रेम, नैतिकतेवर भाष्य करणारे प्रेम, दोन भिन्न प्रांतांतील लोकांमध्ये झालेले प्रेम, लपूनछपून एकमेकांचा हात घट्ट धरून पुढे जाणारे प्रेम, असे नाना प्रकार दाखवले. ‘आदित्य-मेघना’, ‘शिव-गौरी’, ‘जय-अदिती’ या जोडय़ा याच मालिकांमधून चिरतरुण झाल्या आहेत.

‘झी युवा’वरील ‘फुलपाखरू’ ही तशी अलीकडची पण भलतीच प्रसिद्ध  झालेली मालिका. महाविद्यालयीन जीवन, आकर्षण, प्रेम आणि त्यातून घडलेल्या काही गोष्टी निभावताना आजच्या तरुणाईचे जे वास्तव आहे, ते या मालिकेने अचूक हेरले. ‘हृता दुर्गुळे आणि यशोमान आपटे’ म्हणजे आपणच होय असाच भास अनेकांना होत होता आणि आजही होतो आहे.

‘कलर्स मराठी’वरही अशाच काही जोडय़ा आणि प्रेमकहाण्या अजरामर झाल्या. ‘घाडगे अ‍ॅण्ड सून’, ‘राधा प्रेम रंग रंगली’, ‘असं सासर सुरेख बाई’, ‘हे मन बावरे’ या मालिकांनी प्रेमाच्या अनेक बाजू उलगडल्या. त्यातही एका विधवा मुलीवर प्रेम करणारा मुलगा आणि त्यांचे लग्न हा विचार मांडणारी ‘हे मन बावरे’ ही मालिका विशेष ठरली. ‘आपल्यापेक्षा वयाने दोन वर्षांनी मोठी असलेली ‘अनुश्री’ आणि तिच्या प्रेमात पडलेला ‘सिद्धार्थ’ अनेक कुटुंबांना जगण्याचा नवा दाखला देऊन गेले. ‘घाडगे अ‍ॅण्ड सून’ या मालिके तील  ‘अक्षय-अमृता’ ही जोडीदेखील भरपूर गाजली. मनाविरुद्ध लग्न झालेले असतानाही कुटुंबांची जबाबदारी न नाकारता अमृता त्या कुटुंबात राहाते आणि तिथले परंपरा, सोन्याच्या पेढीचा वारसा पुढे चालवते. याच कौटुंबिक जिव्हाळ्यातून अक्षयही तिच्या प्रेमात पडतो आणि त्या दोघांची अशी वेगळी प्रेमकथा सुरू होते. ‘राधा प्रेम रंगी रंगली’ या मालिकेनेदेखील प्रेक्षकांना अशीच भुरळ घातली होती. प्रेमात आलेला गरीब-श्रीमंतीचा भेद आणि त्यातून उलगडलेला जिव्हाळा मालिकेच्या केंद्रस्थानी होता. सचित पाटील आणि वीणा जगताप यांच्या दर्जेदार अभिनयाने साकारलेले ‘प्रेम’ प्रेक्षकांनाही प्रेमात पाडून गेले.

कादंबरी कदम आणि गौरव घाटनेकर यांची प्रमुख भूमिका असलेली ‘तुजवीण सख्या रे’ ही मालिका जवळपास दहा वर्षांपूर्वी ‘स्टार प्रवाह’ या वाहिनीवर आली. ग्रामीण भागातील मुलगी आणि शहरी भागात वाढलेला मुलगा यांच्यात जुळलेले सूत हा कथाभाग मालिकाविश्वात चांगलाच प्रभावी ठरला. ज्याला उत्तम प्रेमकहाणी म्हणता येईल अशीच एक मालिका या वाहिनेने केली ती म्हणजे ‘स्वप्नांच्या पलीकडले’. मालिकेतील ‘वैदेही आणि श्रेयस’ ही जोडीही लोकप्रिय ठरली. श्रीमंत घरातील मुलगी आणि मध्यमवर्गीय मुलगा असा जरी मालिकेचा बाज असला तरी मालिकेत घडणारे विविध प्रसंग आणि संवाद यामुळे मालिकेचे वेगळेपण सिद्ध झाले. ‘देवयानी’ या मालिकेने तर ग्रामीण भागात कहर केला. लोकांच्या घरांवर, गाडय़ांवर केवळ ‘संग्राम आणि देवयानी’ यांचे फोटो त्यावेळी झळकले होते. मालिकेला असलेले ग्रामीण भाषेचे कोंदण, घरंदाजपणा आणि त्यात बळजबरीने सून म्हणून आणलेली स्वत:चे विचार असलेली पुरोगामी घरातली देवयानी कशी रुजते, परिवर्तन घडवते याची ही प्रेमकथा ग्रामीण भागांत आजही चर्चिली जाते.

बऱ्याचदा मालिकेत प्रेम दाखवताना दोन्ही बाजू परस्परविरोधी दाखवल्या जातात. गरीब-श्रीमंत, ग्रामीण शहरी, उच्चशिक्षित-अडाणी असा भेद कायमच राहिला आहे. हा सामाईक धागा असला तरी त्यातल्या प्रमुख पात्रांमध्ये प्रेम खुलवण्यासाठी लेखक-दिग्दर्शक नाना शकला लढवतात आणि मालिकेला वेगळेपण प्राप्त करून देतात. म्हणूनच प्रेमावर आधारलेली किंवा कौटुंबिक आशयातून प्रेमाकडे जाणारी प्रत्येक मालिका आपल्याला आपलीशी वाटते. सरतेशेवटी वयोगट कुठलाही असला तरी ‘प्रेम’ ही अजरामर असणारी बाब आहे. त्यामुळे मालिकेतून समोर येणारे प्रेम आणि त्यावर प्रेम करणारे प्रेमळ प्रेक्षक हा प्रवास अखंड सुरूच राहणार आहे.