असिफ बागवान

कोणत्याही गोष्टीचा अतिलोभ हा माणसाला त्याच्या अध:पतनाकडेच नेत असतो. मानवी स्वभावात हमखास आढळणारा हा गुण (दुर्गण!) किती वाईट ठरू शकतो, हे सांगणाऱ्या अनेक गोष्टी, कथा आपण वाचलेल्या आहेत. ‘नेटफ्लिक्स’वर गेल्याच महिन्यात प्रदर्शित झालेला ‘अनकट जेम्स’ हा चित्रपट ‘अति तेथे माती’ या म्हणीचा प्रत्यय देतो. चित्रपटाचे कथासार या म्हणीवर आधारित असले तरी, त्यातील कथेची मांडणी, दिग्दर्शन आणि अभिनय याबाबतीत सगळं अगदी मोजूनमापून केलं गेलं असल्याने ‘अनकट जेम्स’ हा प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा आणि प्रत्येक क्षणाला त्यांची उत्कंठा चाळवणारा चित्रपट आहे.

आफ्रिकेतल्या एका खाणीतून काही इथोपियन ज्यू कामगार एक दुर्मीळ ‘ब्लॅक ओपल’ हा दगड शोधून काढतात. हा ‘ब्लॅक ओपल’ म्हणजे, सिलिका आणि धातूच्या रसांच्या मिश्रणाने बनलेला एक बेढब आकाराचा दगड आहे. हा दगड बेढब असला तरी, त्यातून परावर्तित होणारा प्रकाश आणि त्यातील वेगवेगळय़ा प्रस्तरांमुळे त्याला लाभलेली गूढ लकाकी या दगडाला मौल्यवान बनवते. तर, असा हा दगड न्यूयॉर्कच्या डायमंड स्ट्रीटवर हिरे किंवा तत्सम मौल्यवान खडे आणि दागिने बनवणाऱ्या दुकानाचा मालक हॉवर्ड रॅटनर (अ‍ॅडम सँडलर) याच्या हाती सापडतो. रॅटनरचं आयुष्य प्रचंड गुंतागुंतीने भरलेलं आहे. पत्नी दिना हिच्याशी त्याचा काडीमोड जवळपास निश्चित झाला आहे. आपल्याच दुकानात काम करणाऱ्या ज्युलियाशी त्याचं सूत चांगलंच जुळलं आहे. जुगार आणि सट्टेबाजीच्या व्यसनामुळे हॉवर्डवर कर्जाचा प्रचंड मोठा डोंगर झाला आहे. त्याच्यामागे तगादा लावणाऱ्या देणेकऱ्यांमध्ये त्याचा मेहुणा अनरेही आहे आणि अनरेचा खुनशी साथीदार हॉवर्डला वेळोवेळी धमकावून, मारहाण करून कर्ज फेडण्यासाठी पिच्छा पुरवत असतो. असं सतत हेलकावे खाणारं आयुष्य असलं तरी, हॉवर्डचा खुशालचेंडूपणा कायम आहे. हाती आलेल्या ‘ब्लॅक ओपल’कडे पाहून नव्हे, तर, तो विकून बक्कळ पैसे कमवण्याच्या कल्पनेने. हा दुर्मीळ दगड लिलावाद्वारे विकायचा बेत तो आखतो. पण याचदरम्यान ‘एनबीए’तील एक प्रसिद्ध बास्केटबॉलपटू केव्हिन गार्नेट (गार्नेट हा खराखुरा बास्केटबॉलपटू आहे) हॉवर्डच्या दुकानात येतो.

गार्नेटच्या संघाचा चाहता असलेला हॉवर्ड बढाई मारण्याच्या ओघात गार्नेटला तो दगड एका दिवसापुरता जवळ बाळगण्यासाठी देतो. त्याबदल्यात तारण म्हणून तो गार्नेटची ‘एनबीए चॅम्पियनशीप रिंग’ घेतो. मात्र, ही अंगठी सांभाळून ठेवण्याऐवजी तो ती दुसऱ्या सावकाराकडे गहाण ठेवून त्यातून मिळालेली रक्कम गार्नेटच्या सामन्यावर सट्टय़ात लावतो. तो सट्टा जिंकतोही. पण मागाहून त्याला कळतं की प्रत्यक्षात त्याने लावलेला सट्टा अनरेने थांबवलेला असतो आणि ती रक्कमही अनरे आपल्या ताब्यात घेतो. आता हॉवर्डकडे ‘ब्लॅक ओपल’ही नसतो आणि गार्नेटची अंगठीही. आधीच कर्जात बुडालेल्या हॉवर्डसाठी हा आणखी मोठा खड्डा असतो. आर्थिक विवंचनेमुळे मानसिकरीत्या कोसळलेल्या हॉवर्डच्या खासगी आयुष्यातही एक घटना अशी घडते, ज्याने त्याचे आणि ज्युलियाचे संबंध ताणले जातात. या सगळय़ांमुळे निराश झालेला हॉवर्ड पुन्हा दिनाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. मात्र, तीही त्याला धुडकावून लावते. अशा कात्रीत सापडत असतानाही त्याचे सट्टेबाजीचे व्यसन कमी होत नाही. यातूनच मग कहाणी अनेक अनपेक्षित वळणे घेत शेवटाकडे जाते. यात शेवटी हॉवर्डच्या हाती काय लागतं, हे प्रत्यक्ष चित्रपटातून पाहणं अधिक रंजक ठरेल.

रोनाल्ड ब्रान्स्टीनसोबत या चित्रपटाची पटकथा लिहिणारे जोश आणि बेनी सॅफदी यांनी ‘अनकट जेम्स’चं दिग्दर्शनही केलं आहे. या जोडीचा २०१७मधील ‘गुड टाइम’ हा चित्रपट समीक्षकांच्या पसंतीस उतरला होता. तो चित्रपटही साध्या कथेतील अनपेक्षित धक्क्यांनी भरलेला होता. ‘अनकट जेम्स’मध्ये या दिग्दर्शक जोडीने तशीच किमया वेगळय़ा धाटणीच्या कथेतून साधली आहे. चित्रपटाचा नायक अ‍ॅडम सँडलर हा आतापर्यंत प्रामुख्याने विनोदी भूमिकांबद्दल ओळखला जात होता. मात्र, ‘अनकट जेम्स’मधला हॉवर्ड रॅटनर त्याने अप्रतिमपणे साकारला आहे. हॉवर्ड रॅटनर हा काहीवेळा धूर्त आहे, तर काही प्रसंगांत तो भोळा वाटतो. या दोन्ही छटा प्रसंगानुरूप चेहऱ्यावरून व्यक्त करण्यात अ‍ॅडम सँडलर यशस्वी झाला आहे. हॉवर्ड रॅटनरचा लोभीपणा जितक्या प्रभावीपणे सँडलर दाखवतो, तितक्याच प्रभावीपणे तो त्याची हतबलता किंवा मूर्खपणाही अभिनयातून सादर करतो. हॉवर्डभोवती हे कथानक फिरत असल्याने चित्रपटाचा आत्माच तो आहे. त्यामुळे अन्य कलाकारांना आपली भूमिका दमदारपणे वठवणं, इतकंच काम आहे. ते त्या सर्वानी व्यवस्थित केलं आहे.

सुरुवातीला ‘अनकट जेम्स’ची कथा जुनीच वाटते. पण या कथेत अनेक रंजक चढ-उतार आहेत. या चढउतारांचा तो ‘ब्लॅक ओपल’ हा जणू साथीदारच आहे. ज्याच्याकडे तो असतो, त्याच्यासाठी तो क्षण आनंदाचा असतो. आता ‘तुझं भविष्य उज्ज्वल’ अशी हमीच जणू हा दगड तो जवळ बाळगणाऱ्याला देत असतो. पण सोन्याचं अंड देणारी कोंबडी कापली तर भरपूर सोनं मिळेल, ही कल्पना जितकी अवास्तव तितकाच नकली तो दगड जवळ बाळगणाऱ्याचा लोभी आशावाद असतो. हा हव्यास कुणाला कोठे घेऊन जातो, हे जाणण्यासाठी ‘अनकट जेम्स’ पाहायलाच हवा.