अमिताभ बच्चन यांनी आजवरच्या कारकिर्दीमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करावं असं प्रत्येक कलाकाराला वाटत आहे. आतापर्यंत बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी त्यांच्यासोबत काम केलं आहे. तर काही कलाकारांना मात्र बिग बींसोबत स्क्रीन शेअर करायची इच्छा आहे. त्यातीलच एक कलाकार म्हणजे अभिनेता आयुष्मान खुराणा. आयुष्मानची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार असून अमिताभ बच्चन आणि आयुष्मान लवकरच शूजित सरकारच्या चित्रपटामध्ये एकत्र झळकणार आहेत.

बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक शूजित सरकार यांनी आतापर्यंत ‘पीकू’, ‘मद्रास कॅफे’ आणि ‘विक्की डोनर’ यासारख्या चित्रपटांच दिग्दर्शन केलं असून लवकरच त्यांचा ‘गुलाबो सिताबो’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये अमिताभ आणि आयुष्मान पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे.

सध्या या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम सुरु असून चित्रपटाची कथा जुही चतुर्वेदी यांनी लिहिली आहे. जूनमध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. “सध्या मी आणि जुही या चित्रपटाच्या कथेवर काम करत आहोत. जुही जेव्हा एखाद्या चित्रपटाची कथा लिहित असते तेव्हा ती कथा कायम हटके असते. तिचा एक वेगळा स्वतंत्र असा ट्रेडमार्क असतो. तिने लिहिलेली कथा मी वाचली असून ही कथा वाचल्यानंतर लगेच अमिताभ बच्चन आणि आयुष्मान यांना सांगितली”, असं शूजित यांनी सांगितलं.

दरम्यान, ‘गुलाबो सिताबो’व्यतिरिक्त शूजित सरकार ‘उधम सिंह’ यांच्या बायोपिकमध्ये व्यस्त आहेत. या चित्रपटामध्ये विकी कौशल मुख्य भूमिकेत झळकणार आहे.