प्रसिद्ध टीव्ही निर्माता, अभिनेता व ‘बिग बॉस ११’ या रिअॅलिटी शोचा स्पर्धक विकास गुप्ता याने काही दिवसांपूर्वीच तो बायसेक्शुअल असल्याचा खुलासा केला होता. त्याने केलेल्या गौप्यस्फोटानंतर सोशल मीडियावर याविषयी चर्चा रंगली आहे. त्यातच विकासने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत लहान असताना त्याचे मित्र-मैत्रिणी त्याची कशी खिल्ली उडवायचे हे सांगितलं आहे.
“जेव्हा मी लहान होतो, तेव्हा शाळेत माझ्या वरच्या वर्गातील मुलं आणि माझे मित्र माझी कायम मस्करी करायचे. माझे हावभाव माझ्या ओठांची ठेवण यावर विनोद करायचे. ज्यावेळी मी सुट्टीत घरी यायचो, तेव्हा सुद्धा संध्याकाळी कॉलनीतील मुलं आणि मुलीसुद्धा मला चिडवायचे. हा बघा कसा मुलींसारखा वागतोय, विकास मुलगीच आहे, त्याचे हातवारे पाहा, असं म्हणत मोठ्या मुलीसुद्धा चिडवायच्या”, असं विकासने सांगितलं.
पुढे तो म्हणतो, “याच्या ओठांची ठेवण सुद्धा मुलींसारखी आहे, हा कधी भांडणंही करत नाही. एकदम भित्रा आहे मुलींसारखा. चला जरा याच्याविषयी चर्चा करु असं मुली म्हणायच्या आणि जोरजोरात हसायच्या. त्या कायम माझ्या दिसण्यावर, माझ्या बोलण्याच्या पद्धतीवर हसायच्या आणि नेहमी म्हणायच्या ही तर मुलगी आहे. त्यावेळी खरंच मला अत्यंत वाईट वाटायचं. मला वाटायचं की मुलगी म्हणून चिडवणं हे फार अपमानास्पद आहे. कारण मुली या भित्र्या आणि गरीब स्वभावाच्या असतात. त्यांना कायम संरक्षणाची गरज असते. जोपर्यंत मी बालाजी टेलीफिल्म्सच्या पाचव्या मजल्यावर पोहोचलो नव्हतो तोपर्यंत मला कायम हेच वाटायचं. ज्यावेळी मी एकता कपूरला भेटलो तेव्हा मला खऱ्या स्त्रीचा अर्थ उगमला. स्त्री कमकूवत नसते, तर ती धैर्यशाली असते. त्यामुळे मला ट्रोल करणाऱ्यांनो आणि खोट्या अकाऊंटवरुन माझ्याशी बोलणाऱ्या एक्स गर्लफ्रेंड्स तुम्हाला सगळ्यांचे मनापासून धन्यवाद की तुम्ही मला मुलगी, स्त्री म्हणून चिडवलं. आणि तुम्हाला सगळ्यांना एक आवर्जून सांगतो, तुम्हाला जन्म देणारी सुद्धा एक स्त्रीच आहे. जेव्हा तुम्ही आमच्यासारख्यांना स्त्री म्हणून हिनवता तेव्हा तो अपमान नाही, तर आमच्यासाठी कॉम्प्लिमेंट असते”.
दरम्यान, ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेतील मुख्य अभिनेत्री शिल्पा शिंदेसोबत विकास गुप्ताचे वाद झाल्यानंतर तो प्रकाशझोतात आला होता.विकास या मालिकेचा निर्माता आहे. शिल्पाला मालिकेतून मध्येच काढून टाकण्यात आलं होतं. त्यानंतर तिने विकासवर काही आरोप केले होते. त्यानंतर ‘बिग बॉस ११’ या रिअॅलिटी शोमध्येही विकास चर्चेत होता.