मराठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने एका ट्विटर युजरला, ‘तू करोना पॉझिटिव्ह आहेस का’ असा प्रश्न विचारला. त्यावरून भाजपाच्या सोशल मीडिया व आयटी सेलचे सहनिमंत्रक पियुष कश्यप यांनी त्याला सुनावलं. करोना व्हायरस पसरू नये यासाठी सरकार जे काही काम करत आहे, त्याची स्तुती करणारं ट्विट सिद्धार्थने केलं होतं. त्यावर एका ट्विटर युजरने महाराष्ट्र व मुंबईतील करोनाग्रस्तांचा आकडा लिहित सरकारला सलाम, असा उपरोधिक टोला लगावला. या ट्विटर युजरला सिद्धार्थने ‘तू करोना पॉझिटिव्ह आहेस का?’ असा प्रश्न विचारला होता.

‘सिद्धार्थ चांदेकर या अभिनेत्याला संपूर्ण महाराष्ट्राने आणि मराठी माणसाने डोक्यावर घेतलं. परंतु सिद्धार्थ चांदेकरला खरे आकडे सांगितले तर लगेच समोरच्याला करोना झाला का म्हणून हिणवणे कितपत योग्य आहे? अभिनेते स्वत:ला समजतात कोण? माणुसकी नावाचा प्रकार वगैरे असतो का यांच्यात?’, असा सवाल पियुष कश्यप यांनी केला. इतकंच नव्हे तर ‘माफी मागून ट्विट डिलीट केलं असतं तर त्याच्या समर्थकांमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये चांगला संदेश गेला असता. पुन्हा फालतू ट्विट करू नकोस’, अशा शब्दांत त्यांनी सिद्धार्थला सुनावलं.

पियुष कश्यप यांच्या या ट्विटनंतर सिद्धार्थने दोघांचीही माफी मागितली. ‘आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. लवकरच यातून बाहेर येऊ,’ असं म्हणत सिद्धार्थने त्याची चूक मान्य केली.