हे ऐकायला काहीसे वेगळे वाटेल. पण सध्या चर्चेत असणाऱ्या ‘डिअर जिंदगी’ या चित्रपटाच्या वाट्याला एक अडचण आली आहे असेच दिसतेय. किंग खान आणि आलिया भट्ट यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या ‘डिअर जिंदगी’ या चित्रपटाला ब्रिटिश सेन्सॉर बोर्डाने ‘पॅरेन्टल गाइडन्स सर्टिफिकेट’ देऊ केले आहे. ब्रिटिश सेन्सॉरच्या मते या चित्रपटातील काही भाग लहान मुलांसाठी योग्य नसल्याचे कारण देत सेन्सॉरने या चित्रपटाला हे प्रमाणपत्र दिले आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन याबाबतची माहिती दिली आहे.

भारतीय सेन्सॉरविषयी बोलायचे झाले तर गौरी शिंदे दिग्दर्शित या चित्रपटाला सेन्सॉरने कोणतीही कात्री न लावता हिरवा कंदिल दाखवला होता. त्यामुळे या चित्रपटाची संपूर्ण टीम भलतीच आनंदात होती. पण, डीएनए या वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार ‘डिअर जिंदगी’ या चित्रपटातील एका जरी दृश्यावर कात्री लावली तर ते चुकीचेच ठरेल अशी भूमिका सेन्सॉरने मांडली होती. त्यामुळे ब्रिटिश सेन्सॉरचा सध्याचा निर्णय पाहता पहलाज निहलानींच्या निर्णयावर ब्रिटिश सेन्सॉरने प्रश्नचिन्हच उभे केले आहे.

वाचा: प्रेमभंगाच्या तणावातून बाहेर पडण्यासाठी आलिया जाणार सुट्टीवर

दरम्यान सध्या ‘डिअर जिंदगी’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये आलिया भट्ट आणि शाहरुख खान व्यग्र आहेत. या चित्रपटामध्ये आलिया भट्ट एका नवख्या सिनेमॅटोग्राफरच्या भूमिकेत दिसणार आहे. शाहरुख खान आणि आलिया भट्ट व्यतिरिक्त या चित्रपटामध्ये अभिनेता कुणाल कपूर, आदित्य रॉय कपूर, अंगद बेदी हे कलाकारही झळकणार आहेत. २५ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.