News Flash

आयुष्यावर गप्पा!

२०११ सालापासून ब्रिटन आणि विशेषत: स्कॉटलंड देश वाढत चाललेल्या आत्महत्यादरांनी आंतरराष्ट्रीय वृत्तविषय बनला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

पंकज भोसले

आत्महत्या या गंभीर सामाजिक समस्येच्या विषयाला हाताळणारे चित्रपट बऱ्यापैकी सकारात्मक दृष्टिकोनाची झालर पांघरत ‘आयुष्याचे महत्त्व’ हा उपदेशामृताचा झरा कथानकात प्रसंगा-प्रसंगात कसा पाझरत राहील याची दक्षता घेताना दिसतात. ज्यांना या विषयावरील चर्चासुद्धा वर्ज्य वाटू शकेल, त्यांनी ‘विल्बर वॉण्ट्स टू किल हिमसेल्फ’ आणि ‘रिस्टकटर्स ए लव्हस्टोरी’ या दोन बऱ्यापैकी रोमॅण्टिक चित्रपटांचा आस्वाद घेणे गरजेचे आहे. दोन्ही सिनेमांत आत्महत्या या क्रियेचे करता येईल तितके विडंबन करीत अन् उपदेश-संदेशाचा साचीव भाग वगळत मनोरंजन परिणाम साधण्यात आला आहे. पर्यावरण ऱ्हासापासून आर्थिक मंदीपर्यंत, दुर्धर आजारापासून अपघाती दुर्घटनांपर्यंत आणि गुंडशाही-झुंडशाही-दडपशाहीतून बचावल्यानंतर आयुष्याचे कवतिकच वाटावे अशी परिस्थिती सध्या जागतिक भवतालात असताना जगणे म्हणजे ‘वा-वा-वा-वा, छान-छान-छान-छान’चा पारंपरिक अतिसोस नसलेला या विषयावरचा एक बरा चित्रपट नुकताच आला आहे. ‘कनेक्ट’ या स्कॉटलंडमधील चित्रपटात सध्या तेथे वाढत चाललेल्या सामाजिक प्रश्नाकडे जगभराचे लक्ष वेधत एक रहस्य-चकवाही निर्माण केला आहे.

२०११ सालापासून ब्रिटन आणि विशेषत: स्कॉटलंड देश वाढत चाललेल्या आत्महत्यादरांनी आंतरराष्ट्रीय वृत्तविषय बनला आहे. विशी ते चाळीशी या आयुष्याच्या सर्वात महत्त्वाच्या टप्प्यात तरुण-तरुणींच्या आत्महत्या थांबविण्यासाठी विविध समुपदेशनाचे कार्यक्रम सुरू झाले, तरी त्या पूर्णपणे थांबलेल्या नाहीत. त्यामुळे हा राष्ट्रीय प्रश्न बनवत स्थानिक आणि देश पातळीवर जोरदार मोहिमा राबविल्या जात आहेत. (गंमत ही की याच काळात पूर्ण भारतात नव्हे तर एकटय़ा महाराष्ट्रात निव्वळ शेतकरी आत्महत्यांची आकडेवारी स्कॉटलंडमधील आत्महत्येंच्या तीन पटींत भरणारी असूनही आपल्या यंत्रणेच्या पातळीवर ती अद्यापतरी गंभीर समस्या नाही.)

मेरिलिन एडमंड यांचा ‘कनेक्ट’ चित्रपट स्कॉटलंड सरकारी मोहिमेचा भाग नाही. तो ‘ही पहा समस्या’ असा धोशा लावत माहितीपट बनण्याचा प्रयत्न करीत नाही. यात आत्मभान हरपत चाललेल्या ब्रायन (केव्हीन गथरी) या तरुणाची कहाणी आहे. स्कॉटलंडमधील छोटय़ाशा शहरगावात या तरुणाला नोकरी आहे, राहायला घर आणि जगण्यासाठी लागणारी (मोबाइल, टीव्ही आदी) सर्व आयुधे आहेत. त्याचे नातेवाईकही गाडीने जाता येईल इतक्या ठरावीक अंतरावर आहेत. या साऱ्या गोष्टी असतानाही त्याचे चित्त मात्र थाऱ्यावर नाही. लोकांत अधिक न मिसळण्याच्या त्याच्या स्वभावामुळे तो आपल्यावर लादलेला एकलकोंडेपणा आणखी विस्तारत नेऊ पाहतो. जेथे जाईल तेथे आत्महत्या करण्याची खुमखुमी त्याच्यात आपोआप संचारते. अडगळीच्या खोलीत दोरी सापडल्यावर त्याला फास घ्यावासा वाटतो किंवा उंच टेकाडावरून खाली आपले शरीर भिरकावून देण्याचा मोह होतो. ब्रायनला असे वाटण्याबाबत नकारात्मक घटनांचा वा घटकांचा कसलाच मारा त्याच्यावर होताना दिसत नाही. दिग्दर्शक मेरिलिन एडमंड त्या छोटय़ा परंतु देखण्या शहराच्या श्वासोच्छवासासोबत ब्रायनच्या आयुष्याच्या गप्पांना सुरुवात करतात. फारच अस्वस्थ आणि आपल्या मोहाच्या अवस्थेत असताना त्याला जेफ (स्टीव्हन मॅक्कोल) हा एका वृद्धाश्रमाचा संस्थापक त्याला टेकाडावरून झेप घेण्यापासून वाचवतो. त्याची समजूत काढून जेफ त्याला घरी पोहोचवितो. आत्मनाशाच्या निर्णयापासून ब्रायनने पूर्णपणे परावृत्त व्हावे, यासाठी तो ब्रायनशी मैत्री करतो.

थोडय़ाशा प्रमाणात का होईना समाजाशी संवाद साधण्यातून ब्रायनमध्ये आमूलाग्र बदल घडायला लागतो. आयुष्याबाबत पुनर्विचार करण्याचा जेफने सुचविलेला एक भाग म्हणून फावल्या वेळात वृद्धाश्रमात मदतनीस म्हणून जायला सुरुवात करतो. तेथे त्याची मैत्री तेथे काम करीत असलेल्या सॅम (शवॉन रायली) या घटस्फोटित तरुणीशी होते. त्यांच्या भेटी-गाठी वाढतात. सॅमच्या सहवासात ब्रायन अधिकाधिक माणसात आल्याची खातरजमा होऊ लागते. दोघांत संवाद आणि विसंवादाचे टप्पे घडून हिंदी चित्रपटातल्या नायकासारखा ब्रायन स्वरचित गाणे जाहीररीत्या गाऊन सॅमचे मन कायमस्वरूपी जिंकतो. हे सारे काही उत्तम प्रकारे सुरू असताना चित्रपट आपल्या निर्धारित वळणांवर येत प्रेक्षकांना मोठय़ा चकव्याला सामोरे जाण्यास भाग पाडतो.

मेरिलिन एडमंड यांचा हा पहिलाच चित्रपटीय प्रयत्न असल्याचे खरे वाटू नये इतकी कुशलता संपूर्ण चित्रपटभर पाहायला मिळते. स्कॉटलंडमधील निसर्ग आणि दृश्यसमृद्ध  घटकांचा चांगल्या अर्थाने नजरेत भरेल इतका वापर करण्यात आला आहे. देशातील आत्महत्येचा प्रश्न काय आणि कोणत्या पातळीवर आहे, याचा सखोल अभ्यास करून या चित्रपटाची कथा आणि रचना करण्यात आली आहे. आत्महत्येचा विषय कथानकात हाताळताना आयुष्यातील चांगलेपणाबद्दल बोल-बोल बोलून कंटाळा आणणाऱ्या सिनेमांपेक्षा ‘कनेक्ट’मध्ये चालणाऱ्या हळुवार गप्पा रंगतदार आहेत. इथली समस्या ही दूरदेशीची नाही, तर आपल्या दारी कित्येक वर्षांपासून ठाण मांडून असल्यामुळे उपायांसाठी नाही, तर प्रश्नाचे स्वरूप समजून घेण्यासाठी तरी हा चित्रपट मदत करू शकेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 8, 2019 4:10 am

Web Title: connect movie review abn 97
Next Stories
1 वेबवाला : पुन्हा तेच तेच.. 
2 ‘नाटक  माझे पहिले प्रेम’
3 अगं बाई.. सासूबाईंची प्रेमकथा आकेरीत रंगणार
Just Now!
X