‘कौन बनेगा करोडपती’ हा एक प्रसिद्ध ‘क्विझ शो’ आहे. या शोच्या माध्यमातून अनेक स्पर्धकांना मोठी रक्कम जिंकण्याची संधी मिळते. या शो च्या सध्या सुरू असलेल्या हंगामाने आतापर्यंत चार स्पर्धकांचे करोडपती बनण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. त्यातील १ कोटी जिंकणारं अगदी ताजं नाव म्हणजे अजीत कुमार. मूळचे बिहारचे असलेले अजीत कुमार यांनी प्रश्नांची खूप चांगली आणि योग्य उत्तरं दिली. १ कोटी रूपय जिंकलेल्या अजीत कुमार यांना ७ कोटीचा जॅकपॉट प्रश्न विचारण्यात आला, पण त्या प्रश्नाचे उत्तर माहिती नसल्याने त्यांनी खेळ सोडला आणि १ कोटी रूपये जिंकले. अजीत यांनी ७ कोटीच्या प्रश्नाला खेळ सोडला त्यामुळे सारेच हळहळले पण सर्वाधिक वाईट क्रिकेटप्रेमींना वाटलं.

अजीत यांना ७ कोटी रूपयांचा प्रश्न क्रिकेटशी संबंधित असलेला विचारण्यात आला होता. “एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय संघाबरोबर दोन टी २० अर्धशतके ठोकणारा पहिला फलंदाज कोण?”, असा प्रश्न अजीत यांना ७ कोटींसाठी विचारण्यात आला होता. या प्रश्नासाठी नवरोझ मंगल, मोहम्मद हफीज, मोहम्मद शेहझाद आणि शाकिब-अल-हसन असे चार पर्याय देण्यात आले होते. अजीत हे कारागृह अधिक्षक आहेत. ते भारतीय रेल्वेसाठी १५ वर्षांपासून कार्यरत आहेत. मात्र क्रिकेटच्या या प्रश्नाबाबत माहिती नसल्याने त्यांना १ कोटी रुपयांवर समाधान मानावे लागले. या प्रश्नाचे योग्य उत्तर मोहम्मद शहझाद असे आहे.

२० जानेवारी २०१७ या दिवशी अफगाणिस्तानच्या मोहम्मद शहझादने हा पराक्रम केला. त्याने या एकाच दिवसात दोन अर्धशतके केली. ओमान आणि आयर्लंड अशा दोन संघांविरूद्ध त्याने अर्धशतकी खेळी केली. आधी त्याने ओमानविरूद्ध ८० धावा केल्या. त्यानंतर त्याच दिवशी त्याने आयर्लंडविरूद्ध नाबाद ५२ धावा केल्या.