अभिनेत्री ट्विंकल खन्नाने कलाविश्वापासून फारकत घेतली आहे. मात्र समाजात घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर ती उघडपणे व्यक्त होत असते. त्यामुळे सोशल मीडियावर तिची कायम चर्चा रंगत असते. अलिकडेच ट्विंकलने एक इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली असून लॉकडाउनमुळे तब्बल ४६ वर्षानंतर आईच्या हातचं जेवण मिळाल्याचं तिने सांगितलं. त्यामुळे सध्या ट्विंकल तिच्या या पोस्टमुळे चर्चेत आली आहे.

ट्विंकलने इन्स्टाग्रामवर डायनिंग टेबलचा फोटो शेअर केला असून त्यावर फ्राइड राइसचा एक बाऊल दिसून येत आहे. या पोस्टला ट्विंकलने मजेशीर कॅप्शन दिलं आहे. त्यामुळे सध्या या कॅप्शनची चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे.

“४६ वर्ष लागले माझ्या आईला हे करण्यासाठी. एका महामारीमुळे लॉकडाउनचा कालावधी वाढला, त्यामुळे कुठेतरी जाऊन मला माझ्या आईच्या हातचं जेवण्याची संधी मिळाली. तिने पहिल्यांदाच माझ्यासाठी कोणता तरी पदार्थ केला आहे.- फ्राइड राइस”, असं कॅप्शन ट्विंकलने या फोटोला दिलं आहे. दरम्यान, ट्विंकल सोशल मीडियावर सक्रीय असून उघडपणे तिचे विचार मांडत असते. बऱ्याच वेळा ती पती अक्षय कुमारचीही फिरकी घेताना दिसते.