छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो म्हणून ‘कपिल शर्मा शो’ ओळखला जातो. शोमध्ये हजेरी लावणारे पाहुणे कलाकार आणि सूत्रसंचालक कपिल शर्मा यांच्यामधील मजामस्ती पाहणे चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. पण आता सोशल मीडियावर दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या चाहत्यांनी शोवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे. पण ही मागणी का केली जात आहे असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
सोमवारी फेसबुकवर Justice For Sushant Singh Rajput या पेजने कपिल शर्मा शोवर बहिष्कार टाकावा अशी मागणी केली. ‘प्रिय सदस्यांनो कपिल शर्मा शोवर बहिष्कार टाका’ असे कॅप्शनमध्ये म्हटले होते.
तसेच त्यांनी पोस्टमध्ये एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ‘प्रिय सुशांतचे कुटुंबीय. सलमान खान हा द कपिल शर्मा शोचा को-प्रोड्युसर आहे. आपण त्याच्या चित्रपटांवरच नव्हे तर इतर अनेक गोष्टींवर बहिष्कार टाकला आहे. तर मग आतापासून द कपिल शर्मा शोवर बहिष्कार टाकू!’ असे म्हटले आहे.
या फेसबुक ग्रूपचे जवळपास ९१ हजार मेंबर्स आहेत. अनेकांनी या पोस्टवर कमेंट करुन लाइक केले आहे. तसेच त्यांनी कपिल शर्मा शोवर बहिष्कार टाका असे ही म्हटले आहे.
अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्यानंतर बॉलिवूडमध्ये घराणेशाही हा वाद पेटून उठला. सुशांतने घराणेशाहीला कंटाळून आत्महत्या केल्याचे म्हटले जात होते. त्यामुळे चाहत्यांनी स्टारकिड्सवर जोरदार टीका केली. तसेच त्यांनी सलमान खान, आलिया भट्ट, सोनाक्षी सिन्हा अशा अनेक फिल्मी बॅकग्राऊंड असलेल्या कलाकारांवर बहिष्कार टाकण्याची मागणी. आता सुशांतच्या चाहत्यांनी सलमान द कपिल शर्मा शोचा को-प्रोड्यूसर असल्यामुळे शोवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 25, 2020 4:21 pm