मराठी सिनेमांनी जगभरातील फिल्ममेकर्सना अनेकदा भुरळ घातली आहे. मला आई व्हायचंय हा सरोगसीविषयी असलेला चित्रपट मराठीमध्ये गाजल्यानंतर आता तो हिंदीमध्ये येण्याच्या तयारीत आहे. ‘सरोगेशन’ म्हणजेच गर्भ भाडयाने देणे /घेणे, ज्यावेळी या विषयावर जास्त बोललंही जात नव्हतं तेव्हा अॅड. समृद्धी पोरे यांनी या चित्रपटाची कहाणी लिहिली. इतकेच नाही तर त्यांनी दिग्दर्शक म्हणूनही काम पाहिले. या चित्रपटाची निर्मितीही त्यांनी स्वत: केली. पदार्पणातच त्यांनी राष्ट्रीय पुरस्कार, राज्य पुरस्कार व आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकावले. आज तब्बल आठ वर्षानंतर या चित्रपटाचा हिंदीत रिमेक होत आहे. हिंदी किंवा इंग्रजी चित्रपटाचे मराठीमध्ये रिमेक होणे काहीसे सामान्य आहे. मात्र मराठीचा हिंदी रिमेक होणे ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे.

दिनेश विजान यांनी एकदा विमानात ‘मला आई व्हायचंय’ हा सिनेमा पाहिला आणि त्यांनी त्याचा रिमेक करण्याविषयी विचार सुरु केला. त्यांना ही कहाणी ऑस्कर विजेता गास डेविसच्या “लायन” या चित्रपटासारखी वाटली. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या बहुचर्चित ‘स्त्री’ या चित्रपटाचे दिग्दर्शक अमर कौशिक आणि निर्माता दिनेश विजान यांनी ‘मला आई व्हायचंय’ या मराठी सिनेमाचा हिंदी रिमेक बनविण्याचे ठरवले. त्यानुसार त्यांना कायदेशीर राईट देण्यात आले आहेत. यामधे हिंदीतील आणि हॉलीवूडमधील गाजलेल्या नायिका काम करणार आहेत. कहाणीचे लेखन स्वतः समृद्धी पोरे करणार आहेत. याआधी या चित्रपटाचा तेलगु रिमेक आला आहे. सुप्रसिद्ध दिग्दर्शक सिगींनतम श्रीनिवास राव यांनी हा चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

‘मला आई व्हायचंय’ या सिनेमाद्वारे दिग्दर्शनाकडे वळलेल्या समृद्धी पोरे या पेशाने वकील आहेत. हायकोर्टात प्रॅक्टीस करत असताना त्यांच्याकडे एक केस आली. प्रचंड भावनिक गुंतागुंत असलेल्या या केसचा विषय खूप महत्त्वाचा असून त्यावर चित्रपट होऊ शकतो हे समृद्धी पोरे यांनी जाणलं. त्यानंतर त्यांनी मोठ्या धाडसाने वकीली करत असतानाच ‘मला आई व्हायचंय’ या सिनेमाचं लेखन दिग्दर्शन निर्मितीही केली. समीक्षकांसह प्रेक्षकांनी गौरविलेल्या या चित्रपटाने अनेकांना भुरळ घातली. त्यानतरचा ‘डॉ प्रकाश बाबा आमटे’ या सामाजिक चित्रपटाने त्यांना प्रसिद्धी व पुरस्कार मिळवून दिलेत. आता त्यांचा ‘हेमलकसा’ हा हिंदी चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. ‘मला आई व्हायचंय’ या सिनेमाच्या हिंदी रिमेक बनण्याची कागदोपत्री कारवाई पूर्ण झाली असून लवकरच चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.