बॉलीवूड कलाकारांना हॉलीवूडमध्येही काम करण्याची इच्छा असते. प्रियांका चोप्रा, इरफान खान या कलाकारांनी तर आपल्या अभिनयाने हॉलीवूडकरांचीही मने जिंकली आहेत. पण याला अपवाद असा एक अभिनेता आहे की ज्याला बॉलीवूडमध्येच राहून येथील चित्रपटसृष्टीत अधिकाधिक चांगले काम करण्याची इच्छा आहे, तो म्हणजे मनोज वाजपेयी.
मनोजला बॉलीवूडमध्येच राहून काम करण्याची इच्छा तर आहेच पण अमेरिकेला जाण्याइतके आपल्याकडे पैसे नसल्याची प्रांजळ कबुलीही त्याने दिली. अलिगढ या चित्रपटाच्या निमित्ताने ‘इंडियन एक्स्प्रेस डॉट कॉम‘ने मनोजशी संपर्क साधला. त्यावेळी तो म्हणाला की, लॉस एन्जलिसला जाण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत. तसेच, तेथे महिनाभर राहून एजन्टला शोधणे मला जमणारे नाही. भारतात मला चांगल्या भूमिका आणि चित्रपट मिळत आहेत. इथे मिळालेल्या भूमिकांकडे मी अधिक लक्ष देऊन चांगले काम करण्याचा प्रयत्न करेन. उगाच ‘लॉस एन्जलिस’ला जाऊन तिथे काळोखात भविष्य शोधत बसण्यास काय अर्थ आहे. मला हे काही योग्य वाटत नाही. माझ्या चाहत्यांच्या माझ्याकडून असलेल्या अपेक्षांना मी तडा जाऊ देणार नाही. मला समोरून हॉलीवूडमध्ये काम करण्याची संधी मिळाली तर मी नक्की करेन. पण हॉलीवूडमध्ये काम मिळवण्यासाठी मी काही अतिरीक्त प्रयत्न करणार नाही. माझ्याकडे काही पैसा नाही. मी जे चित्रपट करतो त्यातून मला फार पैसे मिळत नाहीत. पण मला जे काही या चित्रपटसृष्टीकडून मिळते ते मला आणि माझ्या कुटुंबाला येथे चांगले आयुष्य जगण्यासाठी पुरेसे आहे.
मनोजने त्याला हॉलीवूडमधून काही संधी चालून आल्याचेही यावेळी सांगितले. काही दिग्दर्शकांनी त्याला विचारणा केली होती मात्र, भूमिका न आवडल्याने त्याने चित्रपटात काम करण्यास नकार दिला.
संग्रहित लेख, दिनांक 19th Feb 2016 रोजी प्रकाशित
अमेरिकेला जाण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत- मनोज वाजपेयी
चित्रपटसृष्टीकडून मला जे काही मिळते ते माझ्या कुटुंबाला चांगले आयुष्य जगण्यासाठी पुरेसे आहे.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali
Updated:

First published on: 19-02-2016 at 10:28 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I dont have money to fly down to usa and spend a month looking for an agent in west manoj bajpayee